सुरेश वाडकरांच्या आवाजात ‘ करा रे नामाचा गजर ’
मुंबई / रमेश औताडे लहानपणापासून मनात जपलेले संगीतकार होण्याचे स्वप्न अखेर रविंद्र दामोदर पाबरेकर यांनी साकार केले आहे. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या ‘करा रे नामाचा गजर’ या गणेशभक्तीपर गीताला ज्येष्ठ गायक पंडित सुरेश वाडकर यांनी आवाज दिला आहे. रेड रिबन म्युझिक चॅनेलद्वारे हे गीत प्रकाशित झाले असून विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध आहे. हे पहिलेच गीत पद्मश्री वसंत देसाई यांच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले आहे. वृत्तपत्रे आणि मासिकांमधील कवितांना चाली लावण्याचा छंद पाबरेकर यांना लहानपणापासून होता. भायखळ्यातील वास्तव्यात कव्वालीचे सामने, शाहीर अमर शेख यांचे पोवाडे तसेच नेहरू सेंटरच्या माध्यमातून होणारे लोकसंगीताचे कार्यक्रम पाहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांचे मावसभाऊ राम जामगावकर हे पद्मश्री वसंत देसाई यांच्याकडे ढोलकीवादक होते. या सांगीतिक वातावरणामुळे त्यांच्या मनात संगीताची आवड रुजली. संगीतकार होण्याची इच्छा असतानाही आईच्या विरोधामुळे त्यांनी चित्रकलेकडे वळण्याचा निर्णय घेतला. टेक्सटाइल डिझाईन, कमर्शियल आर्ट आणि फाइन आर्ट असा प्रवास करत ते गेली ३३ वर्षे या क्षेत्रा...