आरोग्य मंत्र्यांना ओवाळणीच्या ताटातून आशेची हाक
मुंबई / रमेश औताडे
दिवाळीचा सण म्हणजे आनंद, आपुलकी आणि नात्यांमधील ऋणानुबंध जपण्याचा दिवस. मात्र, समाजाच्या आरोग्याची जबाबदारी वर्षानुवर्षे आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या गटप्रवर्तक आणि आशा स्वयंसेविकांच्या आयुष्यात आजही आर्थिक असुरक्षिततेचे सावट कायम आहे. याच वेदना आणि अपेक्षा घेऊन महाराष्ट्रातील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी भाऊबीजेच्या निमित्ताने आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. ओवाळणीच्या ताटातून त्यांनी केवळ सणाची परंपरा जपली नाही, तर आपल्या न्याय्य हक्कांसाठी भावनिक सादही घातली. अशी माहिती महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघ अध्यक्ष भगवान दवणे यांनी दिली.
ओवाळणीच्या ताटात सणाचा गोडवा होता; पण मनात वर्षानुवर्षांच्या संघर्षाची वेदना होती.आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या या महिलांना केवळ आश्वासन नको, तर त्यांच्या कष्टांना सन्मान आणि भविष्याला सुरक्षितता मिळावी, अशी भावना या भेटीतून व्यक्त झाली. या वेळी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष भगवान दवणे, रश्मी म्हात्रे, निलेश दातखिले, दिनकर म्हात्रे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
११ नोव्हेंबर २०२६ रोजी पालघर, रायगड, ठाणे, पुणे आणि मुंबई जिल्ह्यांतील गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांनी आरोग्यमंत्री यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भाऊबीजेनिमित्त ओवाळणी केली. यावेळी दिवाळी बोनस देण्याची मागणी करणारे निवेदनही सादर करण्यात आले.
दिवसरात्र ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्यसेवेचे काम करणाऱ्या या महिलांना दिवाळीच्या सणात आर्थिक आधार मिळावा, ही त्यांची प्रमुख अपेक्षा होती. मात्र, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि आर्थिक अडचणींचे कारण देत यंदा दिवाळी बोनस देणे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी गटप्रवर्तकांच्या समायोजनाचा प्रश्नही ठामपणे मांडण्यात आला. दहा वर्षे आणि त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावलेल्या गटप्रवर्तकांना त्यांच्या दीर्घ सेवेचा विचार करून शासन सेवेत समायोजित करावे, अशी मागणी संघटनेने केली. वर्षानुवर्षे कंत्राटी स्वरूपात काम करूनही नोकरीची शाश्वती नसलेल्या गटप्रवर्तकांच्या भविष्याचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.असे भगवान दवणे यांनी सांगितले.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment