गिधाड पक्षी वाचविण्यासाठी उपग्रहाची मदत ;
गिधाड पक्षी वाचविण्यासाठी उपग्रहाची मदत ;
मात्र मनुष्य प्राणी जिवंत ठेवणारी यंत्रण बंद !
मुंबई / रमेश औताडे
गिधाड पक्षी वाचवण्यासाठी विज्ञान, उपग्रह, पैसा आणि यंत्रणा उभी करून शासन कौतुकास्पद काम करत आहे. गिधाडांच्या पायांना उपग्रह टॅग लावून गिधाड कुठे जाते, काय खाते, किती जगते, याचा अभ्यास उपग्रहावरून होणार आहे. हरियाणामधून ३५ गिधाडांना लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. मात्र मनुष्यप्राणी कसा जगत आहे ? त्याचे प्रश्न काय आहेत, तो का आणि कशासाठी धावत आहे , सरकारचे प्रशासनाचे कर्तव्य काय ? याचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडे असणारी यंत्रणा बंद पडल्याने गिधाडापेक्षा वाईट अवस्था मनुष्य प्राण्याची झाली आहे.
आज देशात आणि जगात अन्यायग्रस्त स्थितीच्या नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, कर्जात बुडालेला छोटा व्यापारी, या सर्वांच्या जगण्याच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कोणता उपग्रह लावणार ? गिधाडांची संख्या घटली म्हणून चिंता वाटते, ती वाटायलाच हवी. पण माणुसकीची संख्या घटत चालली आहे, याची चिंता लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला का वाटत नाही ?
एकीकडे जंगलं तोडून, नद्या प्रदूषित करून, जमिनी बळकावून मोठे प्रकल्प उभे राहतात. त्याचा फायदा मूठभर श्रीमंतांना होतो. दुसरीकडे विस्थापित होतो तो गरीब आदिवासी, शेतकरी, कामगार. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे उपग्रह टॅगसाठी कोट्यवधींचा निधी मिळतो, दुसरीकडे शेतमजुराच्या मुलाच्या शिक्षणासाठी, आजारी आईच्या औषधासाठी पैसे नसतात.
गिधाड संवर्धनासाठी कायदा आहे, नियम आहेत. पण पर्यावरणाचे कायदे पाळले जातात का? जंगलतोड, अवैध उत्खनन, प्लास्टिक प्रदूषण, औषधांचा बेकायदेशीर वापर, या सर्वांवर कायद्याची कडक अंमलबजावणी होते का?
गिधाडांना पुन्हा आकाश मिळावे, हीच अपेक्षा. पण त्या आकाशाखाली जगणाऱ्या माणसालाही जगण्याचा हक्क मिळावा, हीच खरी लोकशाहीची मागणी आहे.सरकारने गिधाडांसाठी दाखवलेली तत्परता, आता गरीब माणसासाठीही दाखवावी. पक्ष्यांना वाचवण्यासाठी उपग्रह लावले, पण माणसांना वाचवण्यासाठी माणुसकीच हरवली अशी नोंद इतिहासात होईल.
हरियाणातील पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रात जन्मलेल्या ३५ गिधाडांना लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. यापूर्वी राज्यात ३४ गिधाडे आणली होती. वन विभागाच्या सहकार्याने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मार्फत महाराष्ट्रात गिधाड संवर्धन प्रकल्प राबवत आहे. या ३५ गिधाडापैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात १५, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात १० आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात १० गिधाडे सोडण्याचे नियोजन आहे.
Comments
Post a Comment