वरिष्ठ रेल्वे पोलीस संभाजी कट्यारे यांचे कौतुक


मुंबई / रमेश औताडे  -   पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकाने अपहृत झालेल्या एका वर्षाच्या बालिकेचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन तिची सुटका केली. या प्रकरणी संशयित महिला आरोपीला अटक करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कट्यारे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रारदार महिला आपल्या पती आणि एक वर्षाच्या मुलीसह धाराशिव येथे जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकात आली होती. रात्री रेल्वेची वाट पाहत असताना ते फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या समोरील बाकड्याजवळ झोपले होते. १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते ५.२५ वाजण्याच्या दरम्यान एका अनोळखी महिलेने झोपेचा फायदा घेत बालिकेला तिच्या पालकांच्या ताब्यातून पळवून नेले.

याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक साधने आणि स्थानिक पातळीवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी महिलेचा माग काढला. संबंधित महिला नवी मुंबईतील दिवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला. तपासात तिने बालिकेला सीएसएमटी स्थानकातून नेल्यानंतर पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल पकडल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी बालिकेची सुटका करून आरोपी महिलेला अटक केली. आरोपी महिलेचा यापूर्वीचा गुन्हेगारी इतिहासही तपासण्यात आला असून, तिच्याविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या कारवाईत सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथक आणि गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या तपासामुळे अपहृत बालिकेला अल्पावधीत शोधण्यात पोलिसांना यश आले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान