मराठा समाजाच्या २६ मागण्यांसाठी राज्यभर जनजागृती

मंत्रालय प्रतिनिधी / रमेश औताडे

मराठा समाजाच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय मराठा पार्टीने राज्यव्यापी जनजागृती दौरा सुरू केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील (होनाळीकर) यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा सुरू असून, समाजाच्या २६ प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे.

रायगड किल्ल्यापासून सुरू झालेला हा दौरा कोकणातील विविध जिल्ह्यांतून पुढे जात रत्नागिरीत दाखल झाला. ३१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विविध घटकांशी संवाद साधत मागण्यांबाबत जनजागृती केली.

येत्या ५ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. आंदोलनासाठी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत संपर्क मोहीम राबविण्यात येत आहे.

दरम्यान, अंकुशराव पाटील यांनी रत्नागिरी येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी जिल्हा कार्यालयाचे समन्वयक सिद्धेश सुभाषराव पांळदे देशमुख यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

मराठा समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संघटन मजबूत करण्यावर या दौऱ्यात भर दिला जात आहे. राज्यातील विविध भागांतून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता आगामी आंदोलनासाठी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले.


Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान