गोविंदाचा मृत्यू झाल्यास आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
महाराष्ट्र करणी सेनेची मागणी; अजय सिंह सेंगर यांचा इशारा
मुंबई / रमेश औताडे
दहीहंडी उत्सव आणि सरावादरम्यान गोविंदांच्या होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती अथवा वाळूचा थर पसरविणे बंधनकारक करावे, अशी मागणी महाराष्ट्र करणी सेनेने केली आहे. सुरक्षेच्या उपाययोजना न करता दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आणि त्यात गोविंदाचा मृत्यू झाला, तर संबंधित आयोजकांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केली आहे.
दहीहंडीच्या वेळी मानवी मनोरे रचताना तोल जाणे, उंचीवरून खाली पडणे आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे दरवर्षी अनेक गोविंदा जखमी होतात. काही दुर्घटनांमध्ये गोविंदांना जीवही गमवावा लागतो. पूर्वी दहीहंडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती टाकली जात असल्याने उंचीवरून पडलेल्या गोविंदाला गंभीर दुखापत होण्याचा धोका तुलनेने कमी होता. मात्र, अलीकडील काळात रस्त्यांवर रेती न टाकताच दहीहंडीचे आयोजन केले जात असल्याचा आरोप सेंगर यांनी केला.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र करणी सेनेने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील विविध पोलीस आयुक्तांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून दहीहंडी आयोजकांना सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे. दहीहंडीच्या खाली रेती अथवा वाळूचा थर असणे आवश्यक करण्यात यावे, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मुंबईत २०२५ मध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान ९५ गोविंदा जखमी झाले, तर चार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करणी सेनेने केला आहे. २०२४ मध्ये मुंबईत दहीहंडी फोडताना २३८ गोविंदा जखमी झाल्याचेही सेंगर यांनी सांगितले. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी करून घेता येत नाही. मात्र, काही गोविंदा पथकांकडून या नियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही करणी सेनेने केला आहे.
“थर लावा; मात्र गोविंदांच्या जीवाची काळजी घ्या. बरगड्यांना दुखापत, फ्रॅक्चर किंवा गंभीर इजा होऊ नये यासाठी प्रत्येक आयोजकाने दहीहंडीच्या खाली रेती पसरवावी. सुरक्षेची व्यवस्था न करणाऱ्या आयोजकांविरोधात दुर्घटना घडल्यास पोलिसांत तक्रार करण्यात येईल,” असा इशारा अजय सिंह सेंगर यांनी दिला.
Comments
Post a Comment