कुरारमध्ये भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला
मुंबई / रमेश औताडे
मुंबईतील कुरार परिसरात भरदिवसा एका २५ वर्षीय तरुणीवर वायर आणि चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीवर अचानक हल्ला करण्यात आला. आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर संतप्त महिलांनी आणि स्थानिक नागरिकांनी कुरार पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गांधीनगर परिसरात गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. संबंधित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
Comments
Post a Comment