अधिकृत पत्रकार नोंदणीचे धोरण लवकरच? बोगस पत्रकारितेला बसणार आळा
मुंबई / रमेश औताडे
राज्यात पत्रकारितेची विश्वासार्हता जपण्यासाठी आणि बोगस पत्रकारांच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अधिकृत पत्रकारांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र, पारदर्शक आणि मानक कार्यपद्धती तयार करण्याची मागणी जोर धरत आहे.
पत्रकार म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची शैक्षणिक पात्रता, पत्रकारितेचा अनुभव, संबंधित माध्यम संस्थेचे अधिकृत नियुक्तीपत्र, नियमित कार्याचा पुरावा आणि आचारसंहितेचे पालन यांसारख्या निकषांच्या आधारे नोंदणी प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तज्ज्ञ पत्रकार, संपादक, वृत्तपत्र प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली स्वतंत्र समिती स्थापन करून पत्रकार नोंदणीची स्पष्ट कार्यपद्धती निश्चित करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
या प्रक्रियेमुळे खऱ्या अर्थाने पत्रकारिता करणाऱ्या अधिकृत पत्रकारांना संस्थात्मक संरक्षण, विश्वासार्ह ओळख आणि सन्मान मिळण्यास मदत होईल. त्याचबरोबर पत्रकारितेच्या नावाखाली होणारे गैरप्रकार, खंडणी, दिशाभूल आणि बोगस ओळखपत्रांचा गैरवापर कमी होण्यास हातभार लागू शकतो, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
अधिकृत नोंदणी, नियमित पडताळणी आणि स्पष्ट आचारसंहिता यांची अंमलबजावणी झाल्यास पत्रकारितेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल आणि जबाबदार पत्रकारितेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
7021777291
रमेश औताडे
Comments
Post a Comment