महाविद्यालयांमध्ये अवयवदान फेस्टिव्हल भरविण्याची गरज
तरुण पिढीतून उभी राहू शकते जीवनदानाची चळवळ
मुंबई / रमेश औताडे
देशात दरवर्षी हजारो रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत मृत्यूशी झुंज देत असतात. दुसरीकडे, अवयवदानाबाबत जागरूकतेचा अभाव असल्याने अनेकांना वेळेवर जीवनदान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये दरवर्षी "अवयवदान फेस्टिव्हल" आयोजित करण्याची गरज आहे असे आवाहन पर्यावरण रक्षक समितीचे अध्यक्ष किसन कदम यांनी केले.
आजची तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. समाजात नवीन विचार रुजविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये असते. त्यामुळे अवयवदानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी महाविद्यालयांपेक्षा प्रभावी व्यासपीठ दुसरे असू शकत नाही.
अवयवदान फेस्टिव्हलमध्ये अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञांची व्याख्याने, प्रत्यारोपणानंतर नवजीवन मिळालेल्या रुग्णांचे अनुभव, अवयवदान केलेल्या कुटुंबांचा सत्कार, चित्रकला, घोषवाक्य, निबंध, रील व लघुपट स्पर्धा, रॅली, पथनाट्य आणि अवयवदान प्रतिज्ञा अभियान असे विविध उपक्रम आयोजित करता येतील. इच्छुक विद्यार्थ्यांना अवयवदानाबाबत वैज्ञानिक माहिती देऊन त्यांची नोंदणीही करता येईल.
अवयवदानाबाबत समाजात अजूनही भीती आणि गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांना योग्य माहिती मिळणे आवश्यक आहे. महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी अवयवदानाचा जागरूक दूत बनला, तर ही चळवळ काही वर्षांत जनआंदोलन बनू शकते.
राज्य शासन, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि विद्यापीठांनी संयुक्तपणे दरवर्षी 'राष्ट्रीय अवयवदान फेस्टिव्हल' आयोजित करण्याचा विचार करावा. यामुळे लाखो युवक-युवती अवयवदानाचा संकल्प करतील आणि भविष्यात हजारो रुग्णांना नवजीवन मिळू शकेल.
"कॉलेजचा एक उत्सव केवळ मनोरंजनासाठी नसावा; तो समाजाला नवजीवन देणारा असावा. प्रत्येक महाविद्यालयातून अवयवदानाचा संदेश घरोघरी पोहोचला, तर अनेकांच्या जीवनात आशेचा नवा सूर्योदय होईल."
P R news
7021777291
रमेश औताडे
Comments
Post a Comment