देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य !
देवेंद्र फडणवीस : कसलेले वकील, नवे चाणक्य ! -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. भारतीय जनता पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यासाठी २०१३ साली चर्चगेट येथील नरीमन पॉइंट येथे असलेल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. त्यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन जयराम गडकरी हे होते तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार हे कार्यरत होते. राष्ट्रीय आणि प्रदेश दोन्ही अध्यक्षांना तीन तीन वर्षे मुदतवाढ देण्यात यावी, अशी घटना दुरुस्ती करण्यात येणार होती. त्याप्रमाणे दुरुस्ती तर झाली, मात्र नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्याच्या नसलेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे आणण्यात आले आणि नितीन गडकरी यांच्या ऐवजी राजनाथ सिंह यांच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवण्यात आली. (नंतर नितीन गडकरी हे निर्दोष ठरले) प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना मुदतवाढ मिळणार हे निश्चित होते, परंतु ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी आक्षेप घेतला. जर मुनगंटीवार यांना पुन्हा प्रदेशाध्यक्ष केले तर मी पक्ष सोडून चाललो, असा निर्वाणीचा इशारा मुंडे यांनी दिला असल्याचे सांगण्यात येत होते. अशीही बातमी होती की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या माध्यमातून मुंडे यांनी सोनिया गांधी यांच्या समवेत कॉंग्रेस प्रवेश करण्याबाबत चर्चा केली होती. अर्थात या कळते समजते अशा बातम्या होत्या. खरं खोटं गोपीनाथ मुंडे, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांनाच ठाऊक. परंतु मुनगंटीवार यांनी पक्षाच्या श्रेष्ठींना सांगितले की, मला तुम्ही पदावर ठेवा किंवा ठेवू नका, मी भारतीय जनता पक्षातच राहणार आहे. मुंडे यांनी पक्ष सोडून जाऊ नये, त्यांना रोखा, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल्याचे बोलले जाते. मग प्रश्न असा राहिला की मुनगंटीवार यांच्या नंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण ? तेंव्हा गोपीनाथ मुंडे यांनी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचे नाव सुचविले. श्रेष्ठींनी ते मान्य केले. एक अभ्यासू, हुशार आमदार अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली की, देवेंद्र फडणवीस हे तर नितीन गडकरी यांच्या गटाचे, मुंडे यांनी त्यांचे नाव कसे काय सुचवले ? परंतु ते ना तर महाजन मुंडे गटाचे ना तर गडकरी गटाचे, ते आहेत रेशीमबागेचे म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. देवेंद्र फडणवीस तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात नवे होते. गोपीनाथ मुंडे यांच्या शिफारशीनुसार देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. २०१३ साली गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या नावाची भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली. २०१४ साली मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या. तोपर्यंत नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतात प्रचार दौरा केला आणि संपूर्ण देश पिंजून काढला होता. वातावरण निर्मिती झाली. शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही भारतीय जनता पक्षाच्या समवेत युतीमध्ये होती. गोपीनाथ मुंडे यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेऊन महायुती केली होती. राजू शेट्टी, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटे हे सोबत होते. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि नितीन गडकरी तसेच गोपीनाथ मुंडे यांनी विक्रमी मताधिक्य मिळवून विजय संपादन केला. २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार होते. भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने नितीन गडकरी यांचे नाव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या यादीत होते परंतु गोपीनाथ मुंडे यांचे नांव नव्हते. त्यावेळी एकनाथ खडसे हे विधानसभा विरोधी पक्षनेते तर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष असल्याने मुंडे यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतले. मुंडे यांनी आपली व्यथा मांडली. चर्चा झाली. नरेंद्र मोदी यांच्या समोर कोण जाणार ? परंतु भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस हे मोदींच्या दरबारात पोहोचले. नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारले, "आओ देवेंद्रजी, कैसे आना हुवा ? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मोदीजी, आप प्रधानमंत्री हो रहे हो इसलिये आपको बधाई देने के मक्सदसे आया हुं. साथमें एक सुझाव भी था. नितीन गडकरीजी आपके मंत्रिमंडलमे शरीक हो रहे हैं, हमारे दृष्टीसे अच्छी बात हैं. लेकिन साथ साथमे अगर गोपीनाथ मुंडे साहबभी केंद्रमें आ जाय तो सोनेपे सुहागा." त्यावर नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देखो देवेंद्र, मेरी भी इच्छा थी मुंडे साहब को शामील करने की. लेकिन दो दिन के बाद मैं भारतीय जनता पार्टी के पार्लमेंटरी बोर्ड की मीटिंग बुला रहा हुं. और मैं ऐलान करने जा रहा हुं की महाराष्ट्र का भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री पदका उम्मीदवार गोपीनाथ मुंडेजी रहेंगे. अगर आज मैने मुंडेजी को केंद्र में मंत्री बनाया तो उनका महाराष्ट्र से ध्यान हट जाएगा और मुझे किसीभी कीमतपर महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की सरकार लानी हैं. तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी वकिली मुद्दा पुढे करीत सांगितले की, देखो मोदीजी, आप कहते हैं वह बात बराबर हैं, लेकिन महाराष्ट्र विधानसभाके चुनाव छह महिनोंबाद आ रहे हैं. अगर गोपीनाथ मुंडे जी को अभी केंद्र में शामील किया गया तो अगले छह महिनेतक मुंडेजी को जो पोर्टफोलिओ मिलेगा उस पोर्टफोलिओ द्वारा महाराष्ट्रको फंड भेज देंगे. जिसका लाभ हमें महाराष्ट्र विधानसभा चुनावमें हो सकता है. मुळात व्यापारी डोके असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या डोक्यात ही कल्पना घट्ट बसली. (आणि तेंव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर नरेंद्र मोदी यांचा पक्का वरदहस्त आहे). गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्या समवेत केंद्रीय मंत्रिमंडळात शपथ घेतली. दुर्दैवाने ३ जून २०१४ रोजी महाराष्ट्राचा हा लोकनेता अपघातात मृत्युमुखी पडला. गोपीनाथ मुंडे यांचा केंद्रीय मंत्री म्हणून बीड येथे भव्य सत्कार करण्यात येणार होता परंतु दुर्दैवाने ४ जून २०१४ रोजी त्यांनी बीडच्या मैदानात चिरनिद्रा घेतली. मुंडे यांच्या देहावसानानंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलली. देवेंद्र फडणवीस यांच्या हाती महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाची संपूर्ण सूत्रे आली. गोपीनाथ मुंडे यांच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा मातोश्रीवर सहज होणारा वावर बंद झाला आणि देवेंद्र फडणवीस यांनी मग भारतीय जनता पक्षाची सुकाणू समिती स्थापन केली. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, सुधीर मुनगंटीवार आदी नेतेमंडळी या सुकाणू समिती मध्ये घेण्यात आली. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची पंचवीस वर्षांची युती २४ सप्टेंबर २०१४ रोजी संपुष्टात आली. राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. जशी शिवसेना भाजप युती तोडण्याची घोषणा झाली, अर्ध्या तासात दोन्ही काँग्रेस यांच्या लोकशाही आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आले आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली. १५ ऑक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले. १२३ जागा जिंकून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने सर्वात मोठा पक्ष म्हणून पहिला क्रमांक पटकावला तर अभिमन्यू सारखी एकहाती झुंज देणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या. दोन्ही काँग्रेस पन्नास जागाही प्रत्येकी मिळवू शकल्या नाहीत. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे बहुमत नव्हते परंतु शरदचंद्र पवार यांनी आपल्या अदृष्य हाताने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला तारले. अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला स्थिरता आवश्यक असल्याने त्यांनी नैसर्गिक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला साद घातली. धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांना मातोश्रीवर धाडले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांच्या हाकेला ओ देत सरकार मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेना गटनेते एकनाथ संभाजी शिंदे हे १२ नोव्हेंबर २०१४ रोजी विधानसभेत विरोधी पक्षनेते होते परंतु उद्धव ठाकरे यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. सकाळी विरोधी पक्षनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात संध्याकाळी मंत्रिपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षे पूर्ण केली. २०१९ साली लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान युतीची चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेची माहिती वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मध्ये एका भरगच्च पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा निवडणुकीपर्यंत युती टिकली. पण विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेस बरोबर महाविकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारले. देवेंद्र फडणवीस यांच्या हाती विरोधी पक्षनेते पद आले. २०२२ च्या जून महिन्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत राजकारण रंगले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात असलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेऊन सुरत, गुवाहाटी, गोवा गाठले. सोबत ४० आमदार आणि काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र गोविंदराव पवार, डॉ मनोहर गजानन जोशी आणि प्रमोद व्यंकटेश महाजन यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे कसलेले वकील आणि नवे चाणक्य म्हणून पुढे आलेच होते. त्यांनी दिल्लीतल्या चाणक्य अमित शाह यांचा महाराष्ट्रातील राजकीय सारीपाटावरचा आखलेला संपूर्ण आराखडा अंमलात आणला. एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाच्या धुरीणांनी मुख्यमंत्री पदाची माळ घातली. परंतु मंत्रिमंडळाबाहेर राहून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर नियंत्रण ठेवण्याची देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानुसार 'निष्ठावंत कार्यकर्ते' या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी आधी मुख्यमंत्री पद भूषविले असूनही शिंदे सरकार मध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली. २०२४ साली विधानसभा निवडणुका झाल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती पुन्हा सत्तेत आली असली तरी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या निष्ठेची कदर/जाणीव ठेवीत मुख्यमंत्री पद बहाल केले. जून २०२२ ते २०२४ पर्यंतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान अजितदादा पवार हेही काका शरद पवार यांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा भिडवून सरकार मध्ये सहभागी झाले. दुर्दैवाने अजितदादा पवार यांचे विमान अपघातात देहावसान झाले. अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्या. परंतु कुणाला 'प्रसाद' द्यायचा, कुणाचे 'लाड' करायचे यात देवाभाऊ यांचे चांगलेच 'प्राविण्य' असल्याने डॉ. मनोहर जोशी यांच्या नंतर तारेवरची कसरत करीत सरकार चालविण्यात ते वाकबगार झाले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांच्या बरोबर आहेत त्यांच्या बरोबर 'वकिलीबाणा' दाखविण्यात ते कुठेही कमी पडत नाहीत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत असताना आपल्यापेक्षा वयाने मोठे असल्याने उद्धव हे माझे मोठे भाऊ तर नरेंद्र मोदी हे उद्धव ठाकरे यांचे मोठे भाऊ, असा उल्लेख करणारे देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या बरोबर जुळवून घेतले आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले, तेंव्हा व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित असतांना कार्यक्रमात उपस्थित शिवसैनिकांना "जे खरे मावळे असतील त्यांनी शांत रहावे", असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी करताच सगळे शांत झाले आणि कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. कुणा समोर काय बोलायचे, कुणाला बोलतांना कुणाला कोपरखळी मारायची, शहाला काटशह कसा द्यायचा, विधानमंडळाच्या सभागृहात कशाप्रकारे टोलवाटोलवी करायची, टोलेबाजी करायची, शेरेबाजी कशी करावी, हे कसब त्यांना चांगलेच जमले आहे. राजकीय अपघाताने मुख्यमंत्री आणि विधानपरिषद सदस्य झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सदस्य पदाची मुदत संपत असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले भाषण तसेच अर्थसंकल्पीय भाषण ही त्यांच्या कसलेल्या राजकारणी नेत्याची चुणूक म्हणावी लागेल. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या दोघांची जन्मतारीख २२ जुलै हीच आहे. दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाहीत म्हणून त्यांची जयंती साजरी करावी लागते. अर्थात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने अजितदादा यांच्या जयंतीचा शासकीय यादीत उल्लेख करण्याचा निर्णय घेऊन दादांच्या कार्यकर्त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठीची भूमिका घेतली. देवेंद्र फडणवीस यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जनसंघाच्या तसेच वाजपेयी आडवाणी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या विचारांनी नैतिकता, सिद्धांत, प्रथा, परंपरा पाळून मार्गक्रमण करावे, यासाठी त्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनःपूर्वक शुभेच्छा!* 🌹देवेंद्र फडणवीस : एक दृष्टिक्षेप : देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा तिसरा कार्यकाळ आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ आणि २३ ते २८ नोव्हेंबर २०१९ अशा २ कार्यकाळांसाठी फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण केले आहे.
३० जून २०२२ ते ४ डिसेंबर २०२४ दरम्यान ते महाराष्ट्राचे ९ वे उपमुख्यमंत्री देखील राहिले. तत्पूर्वी ते २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबर २०२४ रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून शपथ घेतली. महाराष्ट्र विधानसभचे २८ वे विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी १ डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात काम पाहिले. देवेंद्र फडणवीस हे १९९९ ते २००९ दरम्यान पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून तर २००९ पासून दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.
३१ ऑक्टोबर २०१४ रोजी वयाच्या ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री. त्यापूर्वी वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते.
२०१९ साली अजितदादा पवार यांच्या सोबतीने सरकार स्थापन करून सर्वात कमी काळासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळली म्हणून देखील त्यांची विक्रमीनोंद आहे.
"माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही", असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी आईला बजावून सांगितले. शेवटी त्या कॉन्व्हेंटमधून त्यांना सरस्वती शाळेत टाकावे लागले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा शहराचा, नगरसेवक, महापौर, पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष झाला आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सोशल मीडियामध्ये गेले काही महिने गाजत असलेली ‘दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही घोषणा २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये प्रत्यक्षात अवतरली.
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नव्वदच्या दशकात झाली व अत्यंत थोड्या कालावधीत जनमानसातील एक सन्मानित नेते म्हणून त्यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्यातील पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी व कायदा, अर्थ, तंत्रज्ञान या क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करून बर्लिन येथील डी.एस.ई. येथून प्रकल्प व्यवस्थापन तंत्रातील डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी त्यांचे वडिल गंगाधरराव फडणवीस आणि काकू शोभाताई फडणवीस यांची राजकीय पुण्याई आहेच. पण देवेंद्र फडणवीस यांचे स्वतःचे कष्टही महत्त्वाचे आहेत. ते १७ वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येत त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी नागपूर महानगरपालिकेची निवडणूक जिंकत नगरसेवक म्हणून पालिकेत पाऊल टाकले. पाच वर्षात आपल्या कामाची चुणूक दाखवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळवत वयाच्या २७ व्या वर्षी नागपूर महापालिकेचे महापौर होण्याचा मान मिळवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यांनी आपले राजकीय नेतृत्व सिद्ध केले. त्यांनी विधानसभेकडे आपला मोर्चा वळवला. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडून येण्याचा करिष्मा केला. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००९ साली तिसऱ्यांदा विजय संपादन केला. २००४ सालच्या निवडणुकीत देवेंद्र यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांचा पराभव करून विधानसभेतील आणि पक्षातील आपले वजन वाढवले. देवेंद्र गंगाधरराव
फडणवीस यांनी मराठी अभिनेत्री व बँकर असलेल्या अमृता रानडे यांच्याशी २००५ मध्ये विवाह केला. २००७ साली देवेंद्र आणि अमृता यांना मुलगी झाली. तिचे नाव दिविजा असून ती सुद्धा प्रचंड हुशार आहे.
फडणवीस यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये केले. देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात उच्च माध्यमिक शिक्षण घेतले.
फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आहे.
१९९९ पासून ते आजपर्यंत विधिमंडळात आमदार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अंदाज समितीचे सदस्य, नगरविकास व गृहनिर्माणाविषयीच्या स्थायी समितीचे सदस्य,
नियम समितीचे सदस्य,
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य,
राखीव निधीविषयी संयुक्त निवड समितीचे सदस्य
सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य,
स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलच्या संयुक्त निवड समितीचे सदस्य म्हणून ही कार्य केले.
’ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटेट फॉर एशिया रीज”चे सचिव
नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबतचे रिसोर्स पर्सन
नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य,
नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल)चे उपाध्यक्ष
संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता मिळालेल्या मुंबई जवळच्या उत्तन भाईंदर येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून कार्य केले.
अमेरिकन सरकारच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्यूज‘ या विषयावर शोधनिबंध सादर
अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशव्हिले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेटचे लेजिस्लेचर
ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाचे सदस्य,
केन्यातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटॅटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य,
चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज काँग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्यूज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क‘ या विषयी सादरीकरण,
डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरुण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व, मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रीजनल मीट‘मध्ये सहभाग, युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटॅट‘मध्ये सहभाग, रशियात मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य, स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को‘ डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया‘ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण, होनोलुलू येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण.
१९८९ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष
१९९९ ते आजतागायत - विधानसभा सदस्य
१९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोन वेळा नागपूरचे महापौर.
१९९४ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष
२००१ साली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
२०१० साली भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस,
२०१३ भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, २०१४ ते २०१९ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, सलग दुसऱ्यांदा शपथ, पण ७२ तासांतच राजीनामा, २०१९ ते जून २०२२ महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते, जून २०२२ पासून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, ५ डिसेंबर २०२४ पासुन तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे सर्वोत्कृष्ट संसदपटूसाठीचा वार्षिक पुरस्कार
नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार
पुण्याच्या मुक्तछंद या संस्थेतर्फे प्रमोद महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला गेलेला पहिला सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून पुरस्कार
रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ म्हणून विभागीय पुरस्कार
नागपूरच्या नागभूषण फाऊंडेशनतर्फे 'नागभूषण' पुरस्कार, सुषमा नवलखे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे चरित्र लिहिताना त्यांची जडण-घडण कशी झाली, तरुण वयातच ते नागपूरचे महापौर कसे झाले याची माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी चार मराठी पुस्तके लिहिली आहे असे सांगण्यात येते, त्यांतील एक - 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' हे एक पुस्तक आहे.
आणखी एक ३६ पानी पुस्तक - 'आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ ज्याचे प्रकाशन ५ जुलै २०२० रोजी करण्यात आले. 🌹 *-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).*
Comments
Post a Comment