चार किलोमीटर लांब साडीला चौदा जागतिक पुरस्कार
मुंबई / रमेश औताडे
विवाहित महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ४ किलोमीटर लांबीच्या विशेष साडीला आणि त्यावर आधारित मोहिमेला जगभरात मोठा सन्मान मिळाला आहे. या मोहिमेने आरोग्य आणि सामाजिक जनजागृती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील १४ प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत. तसेच महिलांच्या आरोग्य आणि हक्कांसाठी दिला जाणारा सर्वोच्च ग्रँड क्लिओ पुरस्कार देखील या मोहिमेला मिळाला आहे.
मुंबईतील मिडिया मेडिक कम्युनिकेशन आणि कॅनडातील क्लिक हेल्थ यांनी रेड डॉट फाऊंडेशन या संस्थेसाठी ही मोहीम राबवली होती. या मोहिमेत भारतीय स्त्रीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या साडीचा वापर करून महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यात आला. देशभरातून जमा झालेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या ४ किलोमीटर लांबीच्या साडीवर भरतकामाद्वारे नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही साडी महिलांच्या न्यायासाठीची लोकभावना व्यक्त करणारे प्रतीक ठरली.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता सभो यांनी या साडीची रचना केली होती. मुंबईतील रॉयल ऑपेरा हाऊस येथे या विशेष साडीचे प्रदर्शन भरविण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या सुरक्षितता, सन्मान आणि कायदेशीर हक्कांबाबत देशभरात चर्चा घडून आली.
मीडियामेडिक कम्युनिकेशन्सचे सह-संस्थापक दिनेश चिंदरकर यांनी सांगितले की, समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर जनजागृती निर्माण करून सकारात्मक बदल घडवून आणणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या जागतिक सन्मानामुळे भारतीय महिलांच्या हक्कांचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
या मोहिमेला एक ग्रँड क्लिओ, सात सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पुरस्कार मिळाले असून, सामाजिक प्रश्नांवर लोकांचा सहभाग आणि जनजागृती किती प्रभावी ठरू शकते याचे हे उत्तम उदाहरण मानले जात आहे.
P R NEWS
7021777291
RAMESH AUTADE
Comments
Post a Comment