आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करा ....पण आमचे म्हणणे पण ऐका - लता बोराडे यांचे सरकारला साकडे

मुंबई  / रमेश औताडे 

दरवर्षी २३ जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिन साजरा करून विधवा महिलांच्या सन्मान, संरक्षण आणि सक्षमीकरणाच्या घोषणा केल्या जातात. यंदाही महिला व बालविकास विभागाने विविध कार्यक्रम, जनजागृती उपक्रम आणि विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रत्यक्षात विधवा महिलांच्या अनेक मूलभूत मागण्या अद्यापही शासन दरबारी प्रलंबित असल्याची खंत विधवा महिला विकास प्रतिष्ठान , आटपाडी या संस्थेच्या अध्यक्षा व 
विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लता बोराडे यांनी खंत व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लता बोराडे यांनी निवेदन देऊन विधवा महिलांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते. निवेदनात आर्थिक सहाय्य, सन्मानाने जगण्याचा हक्क, शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, तसेच पुनर्वसनासाठी विशेष धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली होती.

शासनाच्या परिपत्रकांमध्ये विधवा महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा असली तरी प्रत्यक्षात अनेक महिला आजही आर्थिक, सामाजिक आणि मानसिक संघर्षाला सामोऱ्या जात असल्याचे लता बोराडे यांनी म्हटले आहे.

"विधवा महिलांचा सन्मान केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविणारे निर्णय शासनाने घ्यावेत," अशी मागणी त्यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय विधवा दिनाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सरकारी स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन होत असताना दुसरीकडे विधवा महिलांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अनेक महिलांसाठी हा दिवस केवळ औपचारिकतेचा न राहता न्याय, सन्मान आणि हक्क मिळवून देणारा ठरावा, अशी भावना लता बोराडे यांनी व्यक्त केली  आहे.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

मेघमल्हारच्या रणरागिनींचा महिला दिनी सन्मान