लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी धोरणात्मक चर्चेची गरज
मुंबई / रमेश औताडे
महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असून, समाजात या विषयावर व्यापक आणि संवेदनशील चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले की, बलात्कारासारख्या गंभीर घटनांनंतर समाजात संतापाची लाट उसळते, मोर्चे आणि निषेध आंदोलन केले जातात तसेच सरकारवर कठोर कारवाईची मागणी होते. मात्र, अशा घटना रोखण्यासाठी दीर्घकालीन आणि व्यावहारिक उपाययोजनांवर पुरेशी चर्चा होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
सेंगर यांनी सामाजिक माध्यमांवरील अश्लील सामग्री, इंटरनेटवरील अनियंत्रित प्रवेश आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे तरुणांवर मानसिक परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यांनी असे मत मांडले की, लैंगिक आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर अधिक जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
याच संदर्भात त्यांनी देहविक्री व्यवसायात कार्यरत महिलांना कायदेशीर संरक्षण आणि “सेक्स वर्कर” म्हणून अधिकृत दर्जा देण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, अशी मागणी केली. सर्वोच्च न्यायालयानेही यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजय सिंह सेंगर यांच्या मते, या क्षेत्रात कार्यरत महिलांच्या मानवी हक्कांचे संरक्षण, आरोग्य सुविधा, सुरक्षितता आणि पुनर्वसन यावर सरकारने ठोस धोरण आखणे गरजेचे आहे. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केवळ कठोर शिक्षा नव्हे, तर सामाजिक जागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी ठरू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Comments
Post a Comment