दर्पण, आरसा, मिरर आणि आता आईना ....

मुंबई / रमेश औताडे 

दर्पण आरसा आईना आणि आता मिरर....सर्वसामान्य माणसाच्या जीवनात रोज शंभर वेळा येणारी वस्तू एका नाटकाच्या माध्यमातून मुंबई मराठी पत्रकार संघ येथे प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाली. 

पुण्यातील जागर नाट्यसंस्थेने निर्मित ‘आईना’ हा मराठी-अहिराणी भाषेतील दीर्घांक नुकताच मुंबई मराठी पत्रकार साहित्य संघात यशस्वीरीत्या सादर केला.

‘जागर’ या संस्थेची स्थापना वासुदेव पाळंदे यांच्यासह माधव वझे, श्याम भुतकर, गजानन परांजपे, सुधीर भडकमकर आणि आनंद घाणेकर या रंगकर्मीनी केली होती. संस्थेचे सध्या  अविरत ४८ वे वर्ष सुरू आहे.

‘आईना’  हा दीर्घांक एका जपानी लोककथेवर आधारित आहे. जंगलात साधे, स्वयंपूर्ण जीवन जगणाऱ्या एका चौकोनी कुटुंबाच्या आयुष्यात अचानक आलेला एक साधा आरसा त्यांच्या भावविश्वात कुतूहल, भीती, आनंद आणि गंमत निर्माण करतो. स्वतःचे प्रतिबिंब पहिल्यांदाच अनुभवताना उलगडणारी ही कथा निरागसता, विनोद आणि भावनिक खोली यांचा सुंदर मिलाफ घडवते. 

मूळ  जपानी लोकथेवरील हे नाटक चिओमी हारा ह्यांनी लिहिले आहे. या नाटकाचे हिंदी भाषांतर अशोक चतुर्वेदी ह्यांनी केले. आणि त्यावरून अहिराणी भाषेतील नाट्यरूपांतर योगेश भांडारी आणि सौ माधुरी भांडारी यांनी केले असून, दिग्दर्शन भालचंद्र पंडित व ऋता पंडित यांचे आहे.

नाटकात संतोष कोल्हटकर, ऋता पंडित, शाश्वती वझे, गंधार जोशी, अदिती देवळणकर आणि मंगेश माने यांनी प्रभावी भूमिका साकारल्या आहेत.

या नाटकाचे डॉ. सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, डॉ. सदानंद बोरसे, डॉ. वंदना बोकील, डॉ चंद्रशेखर फणसळकर,गिरीश कुलकर्णी, मधुराणी गोखले आणि ओम भूतकर यांसारख्या अनेक मान्यवरांनी विशेष कौतुक केले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे यंदाच्या भारत रंग महोत्सवात, ना. धो. महानोर यांच्या सन्मानार्थ आयोजित जळगावच्या मैत्र महोत्सवात तसेच नुकताच मराठी पत्रकार साहित्य संघाच्या ‘नाट्यशुक्रवार’ उपक्रमांतर्गतही या दीर्घांकाला सादरीकरणाचा मान मिळाला.  या प्रयोगाला ज्येष्ठ चित्रपट समीक्षक श्री.अशोक राणे, लेखक श्री राजीव नाईक तसेच अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. 

प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादासह ‘आईना’ आता रौप्यमहोत्सवाकडे वाटचाल करत आहे.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संस्थापक अध्यक्ष - रमेश औताडे 
7021777291
rameshautade74@gmail.com

प्रयोगांसाठी संपर्क :
योगेश भांडारी – +91 8208850620
जागर, पुणे – 8010683483

Comments