वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक

वांद्रेतील एसआरए प्रकल्पात २९७ भाडेकरूंची फसवणूक 
मुंबई / रमेश औताडे 

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेल्या वांद्रे येथील आई कंदेश्वरी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकास प्रकल्पात सात वर्षांचा विलंब झाल्याचा आरोप सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. प्रकल्पाचे विकासक हरे कृष्णा डेव्हलपर्स यांनी करारातील अटींचे पालन न करता प्रकल्प रखडवून ठेवला असून २९७ भाडेकरूंशी फसवणूक केल्याचा आरोप सोसायटीचे प्रमुख प्रवर्तक प्रदीप सरफरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सरफरे यांनी सांगितले की, या पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत तब्बल सात वर्षांचा विलंब झाला असून याची नोंद एसआरएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कलम १३(२) अंतर्गत झालेल्या सुनावणीत केली आहे. प्रकल्पातील भाडेकरूंना देय असलेले भाडे १४ महिन्यांपर्यंत देण्यात आले नाही. वारंवार तक्रारी केल्यानंतरच काही प्रमाणात भाडे देण्यात आले, मात्र करारानुसार देण्यात येणारी १० टक्के वाढ अद्याप देण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच अर्धवट बांधलेल्या इमारतीतील फ्लॅट्सच्या वाटपासाठी काढण्यात येणारी लॉटरी दोन वर्षे उशिरा काढण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सोसायटीची संमती न घेता विकासकाने फ्लॅट्सची विक्री सुरू केल्याचाही आरोप करण्यात आला.
सोसायटीच्या म्हणण्यानुसार, पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहत असताना सुमारे २५ ज्येष्ठ नागरिकांचे निधन झाले आहे. तरीही बांधकामाला गती देण्यासाठी विकासकांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

याशिवाय इमारतीचे आराखडे सोसायटीला न दाखवणे, भाडेकरूंशी केलेल्या करारातील अटींचे पालन न करणे, करारानुसार भरपाई न देणे, तसेच १४ रहिवाशांच्या परिशिष्टांची प्रक्रिया अद्याप पूर्ण न होणे असे अनेक गंभीर मुद्देही पत्रकार परिषदेत मांडण्यात आले. या १४ भाडेकरूंच्या बाबतीत एफएसआयचा बेकायदेशीर वापर झाल्याचाही आरोप करण्यात आला.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरफरे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा