‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’ निवडणुकीत ‘संकल्प’ पॅनेलचे आव्हान
मुंबई / रमेश औताडे
१८८८ मध्ये स्थापन झालेल्या ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या ३ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘संकल्प’ पॅनेलने विद्यमान पदाधिकाऱ्यांना आव्हान दिले आहे. संस्थेच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कलाकारांच्या हिताला प्राधान्य देण्याचा संकल्प पॅनेलने व्यक्त केला आहे.
गेल्या सुमारे १५ वर्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना निवडणुकीची माहिती अनेक सभासदांना उशिरा मिळाल्याचा दावा पॅनेलने केला आहे. तसेच दिवंगत ज्येष्ठ शिल्पकार व माजी सचिव चंद्रजित यादव यांचे निधन होऊनही संस्थेच्या ऑनलाइन लिंकवर त्यांचे नाव अद्याप ‘नोडल ऑफिसर’ म्हणून दिसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२०१५ पासून धर्मादाय आयुक्त कार्यालयात आवश्यक ‘चेंज रिपोर्ट’ सादर करण्यात आलेला नसल्याचाही दावा पॅनेलने केला आहे. या आरोपांबाबत अधिकृत कागदपत्रांद्वारे वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक असल्याचेही पॅनेलने म्हटले आहे.
दरम्यान, २००२ नंतर संस्थेच्या विकासासाठी भूखंड मिळविणे, वांद्रे येथील कलासंकुल तसेच विविध कला पुरस्कार सुरू करण्यासारख्या कामांचा संदर्भ ‘संकल्प’ पॅनेलने दिला आहे. २०१० नंतर संस्थेच्या कारभारात अपेक्षित पारदर्शकता राहिली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संस्थेचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छ व पारदर्शक कारभारासाठी ‘संकल्प’ पॅनेलला सभासदांनी मतदान करावे, असे आवाहन पॅनेलने केले आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांची भूमिका या निवेदनात उपलब्ध झालेली नाही.
Comments
Post a Comment