नवी मुंबईकरांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ नको
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पुन्हा मागवा
नवी मुंबई / रमेश औताडे
नवी मुंबई आणि परिसरातील नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे भविष्यात गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पुन्हा राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
शिवसेना नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या प्रकरणी निविदा प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेवर यापूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद असताना निविदा प्रक्रियेतील अटी, पात्रता आणि कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच सार्वजनिक निधीच्या योग्य वापराचा विचार करून निविदा नव्याने मागविण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
तुर्भे परिसरात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्याने त्याचा पर्यावरणावर आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम गांभीर्याने तपासणे आवश्यक आहे. प्रकल्पातून दुर्गंधी, धूर, धुळीचे कण किंवा इतर प्रदूषक निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांवर होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही घाई न करता पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक सर्व निकषांची काटेकोर तपासणी करूनच पुढील निर्णय घ्यावा.
घनकचरा व्यवस्थापन हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित विषय आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया खुली, पारदर्शक आणि स्पर्धात्मक असणे आवश्यक आहे. संबंधित कागदपत्रे, तांत्रिक अटी, पर्यावरणीय निकष आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी याबाबत नागरिकांना स्पष्ट माहिती मिळणे गरजेचे आहे.
तुर्भे व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची हमी देणारी यंत्रणा उभी करण्याबरोबरच प्रकल्पाची स्वतंत्र तांत्रिक व पर्यावरणीय तपासणी करण्यात यावी. त्यानंतरच निविदा प्रक्रिया पुढे न्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निविदा पुन्हा मागवावी. संशयाच्या वातावरणात प्रकल्प राबविण्याऐवजी सर्व आक्षेप दूर करून पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी. आरोग्य पेक्षा प्रकल्प मोठा नाही. त्यामुळे तुर्भेकरांना भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने आताच खबरदारी घेणे आवश्यक आहे.
संस्थापक संपादक रमेश औताडे 7021777291
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क, भारत सरकार नोंदणीकृत
Comments
Post a Comment