दिव्यांग शाळांच्या अनुदानासाठी डॉ. जितेंद्र ओव्हाळ आक्रमक
मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी )
दिव्यांग शाळांना अनुदान देण्यासाठी शासनाने धोरण जाहीर करून पात्र शाळांकडून प्रस्ताव स्वीकारले. मात्र आता अनुदानास पात्र असलेल्या शाळांची संपूर्ण यादी जाहीर न करता एक-एक प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीसाठी पाठविण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंचाचे संस्थापक डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी दिली असून, वेळप्रसंगी छत्रपती संभाजी नगर येथे मंत्री अतुल सावे यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही दिला आहे.
शासनाने अनुदानाचे धोरण जाहीर केले असेल, तर त्या धोरणानुसार पात्र ठरलेल्या सर्व दिव्यांग शाळांची अंतिम यादी पारदर्शकपणे जाहीर करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत कोणाला अधिकार देण्यात आला आहे ? कोणत्या नियमाच्या आधारे प्रस्ताव निवडक पद्धतीने मंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी पाठविले जात आहेत, याचा खुलासा दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केला नाही.
अनुदान हा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि संस्थांच्या हक्काचा विषय आहे तो कोणाच्या कृपेवर किंवा निवडक प्रस्तावांच्या प्रक्रियेवर अवलंबून राहता कामा नये. दिव्यांग मंत्रालयाने तातडीने अनुदानास पात्र सर्व शाळांची यादी, पात्रतेचे निकष, प्रस्तावांची सद्यस्थिती आणि मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया सार्वजनिक करावी. अन्यथा आंदोलन करणार असल्याचे डॉ. जितेंद्र ओव्हाळ यांनी सांगितले.
Comments
Post a Comment