बेस्टच्या आर्थिक संकटावर राहुल गांधींना निवेदन देणार
मुंबई / रमेश औताडे
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक संकटाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना निवेदन देण्यात येणार आहे. बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, तसेच वाढत्या खासगी कंत्राटी बससेवेऐवजी बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा वाढवावा, अशी मागणी नितीन भाऊराव पाटील यांनी केली आहे.
२०२६-२७ या आर्थिक वर्षात बेस्ट उपक्रमाला सुमारे ३,००० कोटी रुपयांचा संभाव्य तुटवडा निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांत बेस्टचा संचित तोटा सुमारे ९,२८६ कोटी रुपये झाल्याचे सांगितले जात आहे. ही परिस्थिती केवळ आर्थिक बाब नसून लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित असल्याचे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
२०१८ मध्ये बेस्टच्या मालकीच्या बसचा ताफा सुमारे ३,२०० होता. आज स्वतःच्या मालकीच्या बसची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, बेस्टची वाहतूक व्यवस्था खासगी कंत्राटदारांवर अधिकाधिक अवलंबून होत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
खासगी कंत्राटी बसची देखभाल, प्रवाशांची सुरक्षितता, बस बंद पडण्याच्या घटना, अपघात तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवा-सुविधांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक वाहतूक ही केवळ नफ्याच्या दृष्टिकोनातून पाहण्याची सेवा नसून मुंबईकरांची मूलभूत गरज असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
या प्रमुख मागण्या
बेस्टच्या ‘वेट लीज’ मॉडेलचा तातडीने पुनर्विचार करून स्वतःच्या मालकीच्या बसचा ताफा वाढवावा, बेस्टच्या मागील आठ वर्षांच्या आर्थिक तोट्याचे स्वतंत्र व पारदर्शक ऑडिट करावे, तसेच आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने विशेष आर्थिक पॅकेज द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय बेस्टच्या स्वतःच्या बस खरेदीसाठी स्वतंत्र निधी, खासगी कंत्राटांमध्ये पारदर्शकता, कंत्राटी बसच्या गुणवत्ता व प्रवासी सुरक्षेसाठी कठोर नियम आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या रोजगाराच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“बेस्टचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवून ती मुंबईकरांच्या हिताची, सक्षम आणि स्वावलंबी सार्वजनिक वाहतूक संस्था बनवावी. राहुल गांधी यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून केंद्र व राज्य पातळीवर हा विषय मांडावा,” अशी मागणी नितीन भाऊराव पाटील यांनी केली आहे.
“बेस्ट वाचवा, मुंबई वाचवा; मुंबईकरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खासगीकरणाच्या विळख्यातून मुक्त करा,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.
.नितीन भाऊराव पाटील ( वरिष्ठ काँग्रेस नेते )
Comments
Post a Comment