गृहनिर्माण संस्थेच्या थकित भाड्यासाठी सचिन लोंढे आक्रमक
मुंबई / रमेश औताडे
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिव सुदर्शन गृहनिर्माण संस्थेच्या (ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स) पुनर्वसन प्रकल्पाबाबत अखेर प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला आहे. ओमकार बिल्डर्सवर रहिवाशांचे तब्बल १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून, हे थकीत भाडे तात्काळ मिळावे आणि रहिवाशांचे पुनर्वसन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (शरदचंद्र पवार) वतीने जोगेश्वरी तालुकाध्यक्ष सचिन आदिनाथ लोंढे यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पाठपुरावा केला.
या रखडलेल्या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नगरसेवक अजितदादा रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर हेदेखील उपस्थित होते.
या बैठकीत ओमकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्ससह इतर रखडलेल्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार बिल्डर्सकडे सुमारे १३३ कोटी रुपयांचे भाडे थकीत असून यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून 'क्लस्टर पुनर्विकास योजना' राबवून नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्याचे ठोस आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
Comments
Post a Comment