पथविक्रेता योजना अंमलबजावणीला गती द्यावी - महापौर रितू तावडे
मुंबई / रमेश औताडे
शासनाकडून पथविक्रेता योजनेची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर, त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु करता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरांवरील प्राथमिक तयारी पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यादिशेने कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले आहेत. तसेच, पथविक्रेता योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौरांनी विविध सूचना देखील केल्या आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज संदर्भात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक १४ ऑगस्ट २०२६) आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते, उपआयुक्त चंदा जाधव, उपआयुक्त सर्वश्री विश्वास मोटे, संतोषकुमार धोंडे, मनीष वळंजू, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पथविक्रेता (फेरीवाले) धोरण तसेच कामकाज विषयक अद्ययावत माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपआयुक्त (विशेष) विनायक विसपुते यांनी संगणकीय सादरीकरणासह दिली. पथविक्रेता समित्यांवरील अशासकीय सदस्यत्वासाठी अशासकीय संघटना आणि समुदाय आधारित संघटना संवर्गातून १०७, निवासी कल्याण संघ संवर्गातून २७ आणि व्यापारी संघांचे प्रतिनिधी संवर्गातून १९ असे एकूण १५३ अर्ज प्राप्त झाले आहेत. सदस्य नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच, पथविक्रेता सर्वेक्षणातून नोंदणीकृत झालेल्या ९९ हजार ४३५ पथविक्रेत्यांपैकी आतापर्यंत ५७ हजार ६९७ पथविक्रेत्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्र प्रदान करण्यात आले आहे. उर्वरित संख्या विचारात घेता, पडताळणीमध्ये ३ हजार ९५० अर्जदार हे मयत असल्याचे आढळले आहे. तर ३७ हजार ७८८ जण हे एकतर संपर्क होवूनही कार्यालयांमध्ये आलेले नाहीत अथवा त्यांच्याशी संपर्क होवू शकलेला नाही. दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या वाढीव मुदतीत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण प्रक्रिया सुरु राहील. यानंतर येणाऱया कोणत्याही पथविक्रेत्यास क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण केले जाणार नाही. शासनामार्फत पथविक्रेता योजना अधिसूचित झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
महापौर रितू तावडे यांनी निर्देश दिले की, पथविक्रेता समिती व ७ परिमंडळीय नगर पथविक्रेता समित्यांचे पुढील कामकाज प्रशासनाने विहित प्रक्रियेनुसार वेगाने पूर्ण करावे. विशेषतः शासनाला सादर करण्यात आलेली पथविक्रेता योजना मंजूर होवून अधिसूचित झाल्यानंतर त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली पाहिजे. ऐनवेळी धावपळ होवू नये, यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभाग स्तरावर विक्री प्रक्षेत्र निश्चित करण्याची प्राथमिक कार्यवाही वेगाने करावी. अनधिकृत पथविक्रीबाबत तक्रारीसाठी उपलब्ध करुन दिलेल्या यंत्रणेची व्यापक जनजागृती करावी, इत्यादी निर्देश श्रीमती तावडे यांनी महापौर या नात्याने दिले.
तसेच, पथविक्रेता योजना ही सुकर व सुलभपणे राबविता यावी यासाठी महापौरांनी विविध सूचनाही केल्या आहेत. एकाच फेरीवाल्याच्या दुबार किंवा अधिक नोंदी होवू नयेत, विक्री प्रक्षेत्र निश्चित करताना रुग्णालये आणि शाळा - महाविद्यालयांचे प्रवेशद्वार, रेल्वे स्थानकांमध्ये ये - जा करण्याचे मार्ग, अग्निशमन केंद्रं, धार्मिक स्थळांचे प्रवेशद्वार, अरुंद पदपथ व वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे, बस थांबे व आपत्कालीन मार्ग अशा ठिकाणी अडथळा होवू नये, याची खबरदारी घ्यावी. पथविक्रेत्यांची संख्या, उपलब्ध क्षेत्र यांचा सुयोग्य ताळमेळ बसवावा. पिण्याचे पाणी - कचरा पेटी - प्रसाधनगृहे यासह आवश्यक मूलभूत सुविधांची सुनिश्चिती करावी. पथविक्रेत्यांना व नागरिकांना आपल्या सूचना किंवा तक्रारी मांडण्याची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. पथविक्रेत्यांच्या जागा व वेळा या नागरिकांना ठाऊक होतील, याकडे समितीने लक्ष पुरवावे. दर महिन्याला किंवा ठराविक कालावधीने पथविक्रेता समित्यांची बैठक होवून कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल, याकडे लक्ष द्यावे. तंत्रज्ञानाचा उपयोग करुन कामकाज सुलभ, जलद व पारदर्शक ठेवावे, यासह विविध महत्त्वाच्या सूचना महापौर श्रीमती रितू तावडे यांनी प्रशासनाला लिखित स्वरुपात केल्या आहेत.
पथविक्रेता योजना अंमलबजावणी सुरु होताना यातील सूचनांचा अभ्यास करुन यथायोग्य अवलंब करण्यात येईल, अशी ग्वाही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
Comments
Post a Comment