देवस्थान इनाम जमिनी प्रकरणी जेलभरो आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
अखिल भारतीय किसान सभेच्या जिल्हा सांगली शाखेच्या वतीने देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.
कित्येक वर्षांपासून देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळावा, त्यांच्या नावावर जमिनींची नोंद व्हावी आणि शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी किसान सभेने केली आहे. या मागणीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष रमेश पाटील आणि जिल्हा सचिव गुलाब मुलाणी यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे लोकशाही मार्गाने जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनामुळे जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता असून, शासनाची भूमिका काय असेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
रमेश औताडे मंत्रालय प्रतिनिधी 7021777291
Comments
Post a Comment