मोतीलाल नगर पुनर्विकास तातडीने सुरू करण्याची पत्रकार परिषदेत मागणी

मुंबई / रमेश औताडे 

गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर क्र. १, २ व ३ या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता आणखी लांबणीवर पडू नये आणि प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी ठाम व एकमुखी मागणी मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवाशी विकास संघ आणि मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती यांच्या वतीने बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

मोतीलाल नगरमधील हजारो कुटुंबे अनेक दशकांपासून जुन्या, जीर्ण व असुरक्षित घरांमध्ये राहत आहेत. पायाभूत सुविधांचा अभाव, अपुरी जागा, वाहतूक कोंडी, अस्वच्छ परिसर आणि सुरक्षेच्या समस्या यामुळे रहिवाशांचे जीवन अत्यंत कठीण झाले आहे. त्यामुळे हा पुनर्विकास केवळ बांधकामाचा प्रकल्प नसून हजारो कुटुंबांच्या सुरक्षित, सन्माननीय आणि चांगल्या भविष्याशी निगडित आहे.

मोतीलाल नगर ही झोपडपट्टी किंवा खाजगी मालकीची जमीन नसून ती म्हाडाची अधिकृत वसाहत आहे. या वसाहतीवरील सर्व हक्क म्हाडाकडे असून संपूर्ण पुनर्विकास प्रक्रिया म्हाडाच्या देखरेखीखाली सुरु आहे. अदनी समूह हा केवळ प्रकल्पाचा विकासक असून सर्व निर्णय आणि अंमलबजावणी संबंधित कायदे, नियम म्हाडाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होत आहेत.

यासोबतच, डीसीपीआर-२०३४ मधील नियम ३३ (५) मधील कलम २.२ नुसार, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हा म्हाडाच्या देखरेखीखाली राबविण्यात येणारा विशेष क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे. या संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर २०२४ रोजी दिलेल्या आदेशामध्ये तसेच त्यानंतर ६ मार्च २०२५ रोजीच्या पुढील आदेशामध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भातील कायदेशीर बाबी स्पष्ट केल्या असून, प्रकल्प डीसीपीआर-२०३४ मधील नियम ३३(५) व त्यातील कलम २.२ अन्वये राबविण्यास कोणताही कायदेशीर अडथळा नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेनंतर प्रकल्पास आवश्यक कायदेशीर स्पष्टता प्राप्त झाली असून, आता पुनर्विकासाच्या कामाला आणखी विलंब न करता तातडीने गती देणे आवश्यक आहे.

मोतीलाल नगर जनकल्याणकारी समिती, मोतीलाल नगर रहिवाशी विकास संघ,  मोतीलाल नगर पुनर्विकास समन्वय समिती आम्ही तीनही समित्यांनी एकत्रितपणे सातत्याने पाठपुरावा करून म्हाडा आणि संबंधित विकासकांशी सकारात्मक चर्चा केली; त्यातून रहिवाशांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून १६०० चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्राचे १६०० चौरस फुट कार्पेट क्षेत्रामध्ये रुपांतर करण्यास मान्यता मिळणार आहे.. याचा लाभ सर्व पात्र रहिवाशांना होणार असून हा निर्णय रहिवाशांच्या जीवनमानात मोठी सुधारणा करणारा ठरेल. याशिवाय इतरही काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा सुरू असून त्या लवकरच सकारात्मकरीत्या पूर्ण होतील, असा आम्हाला विश्वास आहे.

काही मोजक्या स्वार्थी लोकांकडून पुनर्विकासाबाबत अफवा पसरवून, चुकीची माहिती देऊन आणि रहिवाशांमध्ये संभ्रम निर्माण करून प्रकल्पात अडथळे आणण्याचा प्रयत्न होत आहे. वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी विकास प्रक्रियेला विरोध करणे हे हजारो रहिवाशांच्या हिताविरुद्ध आहे. अशा प्रकारे विकास प्रक्रियेत अडथळे निर्माण करणाऱ्यांविरोधात काय‌द्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

आमची भूमिका पूर्णपणे पारदर्शक, रहिवासी-केंद्रित आणि राजकारणापासून अलिप्त आहे. सर्व निर्णय हे केवळ मोतीलाल नगरमधील रहिवाशांच्या हिताचा विचार करूनच घेतले जात आहेत आणि पुढेही तसेच घेतले जातील. आम्ही सर्व रहिवाशांना आवाहन करतो की, कोणत्याही अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर विश्वास ठेवू नये. केवळ म्हाडा, शासन आणि आमच्या समित्यांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे. सर्वांनी एकजूट राखून, शांततेच्या मार्गाने आणि काय‌द्याचा सन्मान ठेवून पुनर्विकास प्रक्रियेला सहकार्य करावे, जेणेकरून मोतीलाल नगरच्या हजारो कुटुंबांचे सुरक्षित व उज्ज्वल भविष्य लवकरात लवकर साकार होईल. असे गौरव राणे, माधवी राणे, मल्हारी भिसे, संतोष परब यांनी सांगितले.
P R NEWS 
7021777291
रमेश औताडे 




Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश