सफाई कामगारांना ‘स्वयंसेवक’ म्हणता येणार नाही
औद्योगिक लेबर कोर्टाचा पालिकेला सवाल
मुंबई / रमेश औताडे
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दुर्गंधीयुक्त कचरा, घाण आणि अस्वच्छता दूर करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना केवळ ‘स्वयंसेवक’ म्हणून संबोधता येणार नाही, त्यांना कामगार दर्जा मिळावा असे निरीक्षण औद्योगिक लेबर कोर्टाने नोंदविल्याची माहिती समोर आली आहे.
हे कामगार प्रत्यक्षात कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच नियमित स्वरूपाचे काम करीत आहेत. मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज दुर्गंधीयुक्त कचरा उचलण्यापासून ते विविध स्वच्छता कामांपर्यंतची जबाबदारी ते पार पाडतात. या कामावरच त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना ‘स्वयंसेवक’ म्हणणे योग्य आहे का, असा प्रश्न न्यायालयाने पालिकेसमोर उपस्थित केला आहे.
सफाई कामगार नेते अखिल भारतीय श्रमिक एकता युनियन चे अध्यक्ष मोहन पी आर देवेंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली असताना न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कामगारांच्या कष्टाचे चीज झाले असून आता हे कामगार कायम कामगार होणार आहेत. त्यामुळे या विजयाचा आनंद प्रत्येक वॉर्ड मध्ये साजरा करावा. सर्वांनी युनियन सोबत राहून सहकार्य करावे असे आवाहन मोहन पी आर देवेंद्र यांनी केले आहे.
न्यायालयाच्या या भूमिकेनंतर आता मुंबई महानगरपालिका या सफाई कामगारांच्या संदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सर्व कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या भूमिकेमुळे कंत्राटी कामगारांच्या सेवाशर्ती, रोजगाराची सुरक्षितता आणि भविष्यातील हक्कांबाबत नव्या चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment