खाजगी हितसंबंधात स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर
तीव्र आंदोलनाचा बाळासाहेब मिरजे यांचा इशारा
मुंबई / रमेश औताडे
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा टॉवर आहे. या टॉवरमधील घरांची विक्री सुरळीत व्हावी आणि ग्राहकांचा विरोध होऊ नये, यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पायपीट करावी लागत आहे.
स्मशानभूमीचे आरक्षण स्पष्ट असतानाही पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाईविरोधात आरपीआयच्या वतीने महापालिका आयुक्त व संबंधित विभाग अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा अंतिम इशारा देण्यात आला आहे.
विकास आराखड्यानुसार ही जागा स्मशानभूमीसाठीच आरक्षित आहे. सामान्य नागरिकांच्या सोयीपेक्षा खाजगी हितसंबंध जपले जात असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. पालिकेने येत्या १५ दिवसांत या आरक्षित जागेवर अधिकृत माहिती फलक लावावा, अन्यथा प्रशासकीय दिरंगाईविरोधात सनदशीर व लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संस्थापक संपादक रमेश औताडे
7021777291
Comments
Post a Comment