राष्ट्रीय शेअर बाजारात कृषी फलोत्पादन , सिंचन प्रक्रिया परिषद आणि प्रदर्शन संपन्न

मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या (एमएसएमजीए) वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त मुंबई येथील राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) कृषी, फलोत्पादन, सिंचन, प्रक्रिया, मार्केटिंग, कोल्डचेन व वेअर हाऊसिंग परिषद आणि सिद्धेश्वर ॲग्रोटेक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना एमएसएमजीए अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी सांगितले की, शेतकरी हवामान बदलाचा सामना करत आणि मोठा खर्च करून उत्पादन घेतो, परंतु सक्षम विपणन (मार्केटिंग) व्यवस्थेअभावी तो निष्प्रभ ठरतो. शेतकऱ्यांना सक्षम मार्केटिंग मिळवून देण्यासाठी एनएससी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबा उत्पादकांचे नुकसान व ईसीजीसीचे सहकार्य:

यावर्षी आंब्याचे उत्पादन केवळ १५ ते २० टक्केच आले. एकूण उत्पादनापैकी १५ टक्के आंबा निर्यात होतो, ज्यातील ५० टक्के निर्यात मध्यपूर्व (मिडल ईस्ट) देशांत होते. मात्र अमेरिका-इझरायल विरुद्ध इराण युद्धामुळे ही निर्यात ठप्प झाली. उत्पादन घट आणि निर्यात बंदी या दोन्ही कारणांमुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्यांना आधार द्यावा, अशी आग्रही मागणी मोकल यांनी केली.

शेतकऱ्यांची निर्यातदारांकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ईसीजीसी (ECGC) कडून विमा पॉलिसी घेतल्यास शेतकऱ्यांना संरक्षण मिळेल, असे मार्गदर्शन ईसीजीसी महाव्यवस्थापक कुमार अंशुमान यांनी केले.

उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन:

 * तीर्थंकार पटनाईक (मुख्य अर्थतज्ज्ञ, NSE): यांनी कृषी फलोत्पादनातील शेतकऱ्यांना बाजारात नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

 * बी. नारायण (रिलायन्स इंडस्ट्रीज लि.): यांनी रिलायन्सतर्फे सेंद्रिय खत (भूवैद्यम) निर्मिती केली जात असल्याची माहिती दिली.
 * डॉ. पी. के. शुक्ला (पिडीलाइट इंडस्ट्रीज): यांनी समुद्र शेवाळाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला मोठी संधी असल्याचे सांगत स्थानिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.

 * बी. के. गुप्ते (ॲबडेट्सर्फ इंडस्ट्रीज): यांनी शेतकऱ्यांसाठी प्रभावी उत्पादने तयार करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
याशिवाय भारत तावरे (सोहन इंडस्ट्रीज), सौरभ रथ (स्टेट बँक ऑफ इंडिया), संजय सुतार (मेघमणी इंडस्ट्रीज) आणि विश्वास सोंडकर (युनिव्हर्सल बायोकेन लि.) यांनी देखील आपले विचार व सादरीकरण मांडले.

उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान:

कार्यक्रमात कृषी फलोत्पादन, सिंचन व मार्केटिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट आणि कंपन्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये १०० वर्षे जुन्या सहकार महर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. (काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांचा विशेष सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश