पागडीमुक्त मुंबई आंदोलनाची १५ ऑगस्टपासून सुरुवात
मुंबई / रमेश औताडे
मुंबईतील ब्रिटिशकालीन पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत करून पागडी रहिवाशांना त्यांच्या घरांवर मालकी हक्क द्यावा, तसेच बेदखल झालेल्या रहिवाशांचे तातडीने पुनर्वसन करावे, या प्रमुख मागण्यांसाठी ‘पागडीमुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात १५ ऑगस्ट २०२६ पासून करण्यात येणार आहे.
कुलाब्यापासून बोरिवलीपर्यंत आणि सायनपासून डोंबिवलीपर्यंत सुमारे ३० हजार पागडी इमारती असून, त्यामध्ये अंदाजे २५ लाख नागरिक राहत असल्याचा दावा अभियानाच्या आयोजकांनी केला आहे. अनेक कुटुंबे अत्यंत कमी क्षेत्रफळाच्या घरांमध्ये राहत असून काही ठिकाणी सामायिक स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत आहे. वृद्ध, आजारी नागरिकांसह महिला आणि लहान मुलांना असुरक्षित परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
अनेक जुन्या पागडी इमारतींमध्ये स्वच्छता, अग्निसुरक्षा, संरचनात्मक सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे हा केवळ पुनर्विकासाचा प्रश्न नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा, मानवी प्रतिष्ठेचा आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा प्रश्न असल्याचे अभियानाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून पागडी रहिवासी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. विशेषतः नॉन-सेस पागडी इमारतींमधील रहिवाशांच्या संरक्षणाचा प्रश्न गंभीर असून, बेदखलीची अनेक प्रकरणे आजही सुरू असल्याचे अभियानाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पागडी व्यवस्था पूर्णपणे रद्द करण्याची मागणी
पागडी व्यवस्थेत किरकोळ सुधारणा करण्याऐवजी ही ब्रिटिशकालीन व्यवस्था पूर्णपणे रद्द करून तिचा कायदेशीर आणि कायमस्वरूपी अंत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पागडी रहिवाशांना कायम असुरक्षित भाडेकरू म्हणून न ठेवता त्यांच्या विद्यमान हक्कांचे योग्य कायदेशीर रूपांतर करून त्यांना घरांवर मालकी हक्क देण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.
पाडलेल्या घरांतील रहिवाशांना न्याय द्या
पागडी इमारती पाडल्यानंतर घरांपासून दूर झालेल्या पात्र रहिवाशांना न्याय मिळावा, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे आणि त्यांच्या मूळ हक्कांचे संरक्षण करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. कोणत्याही नागरिकाला घर पाडल्यानंतर कायमस्वरूपी बेघर ठेवता येणार नाही, अशी भूमिका अभियानाच्या आयोजकांनी घेतली आहे.
संपूर्ण मुंबईत जनजागृती
‘पागडीमुक्त मुंबई’ हे कोणत्याही एका संस्था, संघटना किंवा राजकीय पक्षाचे आंदोलन नसून लाखो पागडी रहिवाशांच्या हक्कांसाठीचे लोकआंदोलन असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. १५ ऑगस्टपासून मुंबईभर जनजागृती अभियान राबविण्यात येणार असून, पुढील टप्प्यात मागण्यांसाठी भव्य रॅली आणि मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.
“पागडी व्यवस्था संपलीच पाहिजे, बेदखली थांबलीच पाहिजे, पाडलेल्या घरांतील रहिवाशांना न्याय मिळालाच पाहिजे आणि पागडी रहिवाशांना मालकी हक्क मिळालाच पाहिजे,” असा निर्धार अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईतून पागडी व्यवस्थेचा संपूर्ण अंत होईपर्यंत ‘पागडीमुक्त मुंबई’ आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment