वृद्ध आजारी कलावंतांचे मानधन त्वरित जमा करण्याची मागणी
मुंबई / रमेश औताडे
राजश्री शाहू महाराज साहित्यिक वृद्ध कलावंत मानधन योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या अनेक कलाकारांचे मानधन तातडीने खात्यात जमा करण्यात यावे, अशी मागणी 'ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशन महाराष्ट्र मुंबई' च्या वतीने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आली आहे.
असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, मुंबई उपनगरातील कलाकारांच्या मानधनाच्या दोन याद्या सांस्कृतिक कला संचालनालयाकडे पाठवून दीड महिना उलटला आहे. पहिल्या यादीतील काही कलाकारांचे हप्ते जमा झाले असले, तरी तांत्रिक अडचणींच्या कारणास्तव बहुतांश कलाकार अजूनही मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पुणे, नांदेड व लातूर येथील अनेक गरीब आणि आजारी लोककलावंत गेल्या काही वर्षांपासून या मदतीची वाट पाहत आहेत.
या समस्येसह असोसिएशनने शासनाकडे विविध महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रलंबित मानधन वेळेवर जमा करणे, लोककलावंत बोर्डाची स्थापना करणे, दर ५ वर्षांनी सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे, आणि कलावंतांना नियमित मानधनासोबत आरोग्य व अपघात विमा संरक्षण देणे यांचा समावेश आहे. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये कलाकारांसाठी खाटा राखीव ठेवणे, संचालनालयाच्या ओळखपत्रावर उपचारात २५ ते ३० टक्के सवलत मिळणे, ५ ते १० टक्क्यांत घरकुल योजना सुरू करणे आणि शासकीय विश्रामगृहात निवासाची सोय उपलब्ध करून देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या लोककलावंतांच्या मागण्यांवर शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment