'धगधगती मुंबई'चे संपादक ज्येष्ठ पत्रकार भीमराव धुळप यांना 'केतकी प्रकाशन'चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर*
*'धगधगती मुंबई'चे संपादक ज्येष्ठ पत्रकार भीमराव धुळप यांना 'केतकी प्रकाशन'चा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर*
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
'धगधगती मुंबई' साप्ताहिकाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक तसेच समाजाभिमुख कार्यकर्ते भीमराव धुळप यांना केतकी प्रकाशन परिवारातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'साहित्य गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या १६ वर्षांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
केतकी प्रकाशनाने दिलेल्या गौरवपत्रात नमूद केल्याप्रमाणे, भीमराव धुळप यांनी आपल्या निर्भीड व धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजातील ज्वलंत प्रश्न, सर्वसामान्यांचे संघर्ष तसेच देशाच्या जवानांचे शौर्य प्रभावीपणे जनतेसमोर मांडले आहे. सामाजिक जाणीव जागृत करणारे त्यांचे लेखन, लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक सक्षम करण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशा देण्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी 'आरोग्यदूत' म्हणून त्यांनी सातत्याने मोलाचे कार्य केले आहे. विविध शासकीय व खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून अनेक रुग्णांना उपचार उपलब्ध करून देणे, त्यांना आवश्यक मार्गदर्शन करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेचा दुवा म्हणून काम करणे, ही त्यांची उल्लेखनीय समाजसेवा आहे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक क्षेत्रातील या योगदानाचीही दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
केतकी प्रकाशन प्रस्तुत भव्य पुस्तक प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, ११ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ज्येष्ठ नागरिक भवन, तिसरा मजला, प्लॉट क्र. ७-सी, गावदेवी मंदिरामागे, सेक्टर १२, नेरूळ (पश्चिम), नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते भीमराव धुळप यांना 'साहित्य गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराबद्दल पत्रकार, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच 'धगधगती मुंबई' परिवाराकडून भीमराव धुळप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील पत्रकारितेच्या, साहित्यिक आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment