ख्रिस्ती समाज मालमत्ता विक्री विरोधात देशव्यापी मोहीम
मुंबई / रमेश औताडे
मेथडिस्ट चर्च इन इंडिया या संस्थेच्या बिशप आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देशभरातील चर्चच्या मौल्यवान जमिनी आणि स्थावर मालमत्ता कवडीमोलाने विकल्या जात असल्याचा आरोप करत ख्रिस्ती समाज बांधवांनी याविरोधात तीव्र एल्गार पुकारला आहे.
मुंबईतील आग्रीपाडा येथील मोक्याच्या जागेवरील बिशप हाऊस बेकायदेशीरपणे बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप समाज बांधवांनी केला असून, याविरोधात देशभरातून मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व अशोक नायर, अशोक मासिदास, फिलिप मकासरे, अविनाश गायकवाड, अजय गायकवाड, सतीश नायर, येशूराज बेली , प्रणिल शिंदे आणि जसपर ख्रिश्चन हे करत आहेत. त्यांनी संपूर्ण भारतातील ख्रिस्ती समाज बांधवांना या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्याचे आणि पत्र मोहिमेत मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे. आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
मेथडिस्ट चर्च इन इंडिया या नावाने कोणतीही संस्था कुठेही अधिकृत नोंदणीकृत नाही. या संस्थेचा संपूर्ण कारभार मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असलेल्या द एक्झेकेटीव्ह बोर्ड ऑफ द मेथडिस्ट चर्च इन इंडिया या संस्थेमार्फत चालवला जातो. धक्कादायक बाब म्हणजे, संस्थेच्या मूळ घटनेतही या नावाचा उल्लेख नाही. असे असतानाही, या संस्थेचे बिशप, जनरल सेक्रेटरी, सेंट्रल खजिनदार आणि काही बडे पदाधिकारी संगनमत करून भारतातील चर्चच्या जमिनी सातत्याने विकून स्वतःचे खिसे भरत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
सध्या मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातील बिशप हाऊस ची जागा मूळची मुंबई महानगरपालिकेची असून ती संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. महानगरपालिकेची कोणतीही परवानगी नसताना, जागेचे टायटल क्लिअर नसताना आणि धर्मदाय आयुक्तांची रीतसर मंजुरी घेण्यापूर्वीच, ही जागा एका बड्या बिल्डरला कवडीमोलाने विकण्याचा घाट घातला गेला आहे.
या भ्रष्टाचाराविरोधात जेव्हा चर्चच्या सामान्य सभासदांनी आवाज उठवला आणि धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी केल्या, तेव्हा बिशप आणि पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुम्हाला चर्चच्या व्यवहारात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. असे सांगत लाखो रुपयांचा निधी वापरून मोठे वकील उभे केले जात आहेत. एवढेच नव्हे तर, विरोध करणाऱ्यांचे चर्चचे सभासदत्व रद्द करण्याची धमकी देऊन त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचे समाज बांधवांनी सांगितले.
या दडपशाहीला न जुमानता ख्रिस्ती समाजातील सजग नागरिकांनी आपली 'प्रॉपर्टी बचाव मोहीम' अधिक तीव्र केली आहे. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतातून मुंबई धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे निषेध आणि तक्रार पत्रे पाठवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी म्हणून पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment