पुढील पिढीला प्रेरणा देणारा ग्रंथ
*भालावलीकर सारस्वत* स्मरण ग्रंथाचे प्रकाशन
*उत्कृष्ट व माहितीपूर्ण ग्रंथ*
- दा. कृ. सोमण
*पुढील पिढीला प्रेरणा देणारा ग्रंथ*
-प्रा. हेमंत सामंत
मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
*भालावलीकर सारस्वत* या स्मरण ग्रंथाचे प्रकाशन शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध खगोलतज्ज्ञ व पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपऩ्न झाले.
सारस्वत हितवर्धक मंडळाच्या शतकपूर्तीनिमित्ताने ज्ञातीचे मूळ, श्रद्धास्थाने आणि जीवनमूल्ये यांनी प्रेरित; स्थलांतरे आणि स्थित्यंतरे याचा बोलका मागोवा घेणा-या या स्मरण ग्रंथाचे संपादन अशोक जनार्दन सिनकर, प्रमोद यशवंत तेंडुलकर, सुधाकर वसंत लोटलीकर यांनी केले आहे.
हा समारंभ कै. श्रीपाद दत्तात्रय तेंडुलकर मंगल कार्यालय, माहीम येथे संपन्न झाला.
व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर, विशेष वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक हेमंत सामंत, कार्यवाह देवीदास सिनकर, उपाध्यक्ष सुहास पोतकर उपस्थित होते.
सभागृहात मंडळाचे खजिनदार उल्हास साखळकर, विश्वस्त रमेशचंद्र तेंडुलकर व डॉ. उल्हास तेंडुलकर, समिती सदस्य प्रताप तेंडुलकर, सुचित कावतकर, प्रमोद तेंडुलकर होते. तसेच मुंबईतील अनेक संस्थांचे तसेच रोहा येथील सारस्वत परिवाराचे पदाधिकारी, प्रतिनिधी, उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मंडळाचे कार्यवाह दीपक मुळये यांनी प्रास्ताविक केले. संपादक अशोक सिनकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे मनोगत निवेदिका स्मिता आपटे यांनी वाचून दाखवले.
मंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ सिनकर यांनी प्रमुख पाहुणे दा. कृ. सोमण व उपाध्यक्ष सुहास पोतकर यांनी विशेष वक्ते प्रा. हेमंत सामंत यांचा सत्कार केला. सौ. मेघा सोमण व सौ. वृषाली सामंत यांनाही सौ. श्रध्दा सिनकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उपस्थित दोन संपादक प्रमोद तेंडुलकर व सुधाकर लोटलीकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डिझाईनर संदेश पाटील, विवेक पारकर, निवेदिका स्मिता आपटे यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे दा. कृ. सोमण यांचे मौलिक मार्गदर्शन करणारे भाषण झाले. ते म्हणाले, आज मी या पुस्तक प्रकाशनासाठी एकटाच आलो आहे असे नाही तर सर्व ग्रहांना घेऊन आलो आहे.
भालावलीकर सारस्वत हा ग्रंथ एवढा उत्कृष्ट व माहितीपूर्ण झाला आहे की त्यासाठी सर्व संबंधितांना धन्यवाद दिल्याशिवाय राहवत नाही. ज्ञातीचा इतिहास, गोत्र, प्रवरे, कुलदैवते, व्यक्ती विशेष असा माहितीपूर्ण मजकूर दिला आहे त्याबद्दल संपादकांना धन्यवाद देतानाच ग्रंथाचे लेआऊट आणि प्रेझेंटेशनही खूप सुंदर झाले आहे, त्यांचेही कौतुक करायला हवे.
हे पुस्तक वाचल्यावर मला भालावली येथे जाऊन यावे असे वाटू लागले आहे. माझे उपस्थितांना आवाहन आहे. या ग्रंथाच्या तीन प्रती विकत घ्या. एक स्वत:साठी, दुसरी तुमच्या समाज बांधवांना द्या आणि तिसरी आपल्या मित्रमंडळींना द्या. त्यांच्यापर्यंत आपल्या संस्थेचे कार्य पोचेल.
माझे संपादकांना सांगणे आहे. या ग्रंथात व्यक्ती विशेष मध्ये कर्तृत्ववान व्यक्तींचा उल्लेख आहे. त्यांच्या कार्यावर आधारित एक पुस्तक लिहावे.
मी खगोलशास्त्रज्ञ असल्यामुळे नेहमी फिरत असतो. जगातील किंवा भारतातील प्रेक्षणीय स्थळे मी पाहिली आहेत. पण आपल्या महाराष्ट्रातील लोणार हे असे एक प्रेक्षणीय स्थळ आहे जे आपण सर्वांनी एकदा तरी पाहायलाच हवे. तेथील निसर्ग सौंदर्यानं भारावून जायला होते. मी तेथे ४० वेळा जाऊन आलो. प्रत्येक वेळी मला नव्याचा भास होतो.
येथे मला जास्त ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत. त्यांनी आनंदाने राहायला हवे. आपण जीवेत् शरद: शतम् म्हणतो म्हणजेच शरद ऋतुप्रमाणे आपण जगायला हवे.
जपानमध्ये १०० वर्षे माणसे आरामात जगतात. त्यांच्या म्हणण्यानुसार माणसाने आपल्या आयुष्यात १० नियम आवर्जून पाळायला हवेत तर तुम्ही शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगू शकाल. पहाटे लवकर उठणे, नियमित व्यायाम करणे, भुकेच्या ८० टक्केच खाणे, निसर्गाच्या सान्निध्यात फिरणे, सतत काहीतरी काम करीत राहणे म्हणजेच कशात तरी मन गुंतवून ठेवायला हवे. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे.
विशेष वक्ते प्रा. हेमंत सामंत म्हणाले, सारस्वत ज्ञातीत अनेक विद्वान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. सामाजिक कार्यात, वैद्यकीय क्षेत्रात, बॅंकिंग क्षेत्रात एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात एवढी मोठी मोठी माणसे आहेत की प्रत्येकावर एक एक पुस्तक लिहिता येईल. भाऊ दाजी लाड, गुं. फ. आजगावकर, ग. रा. कामत, महात्मा गांधींचे चरित्रकार दी. गो. तेंडुलकर अशी कितीतरी नावे घेता येतील. ही यादी भरपूर लांबेल.
सारस्वत बँक, शामराव विठ्ठल बँक, एनकेजीएसबी बँक या सारस्वतांच्या तीन बॅंका तर सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेतच. त्याचबरोबर कॅनरा बँक, सिंडिकेट बँक आणि इतर बॅंकांच्या उभारणीत आपल्या ज्ञातीतील अनेकांचा सहभाग होता.
कुडाळदेशकर, पेडणेकर भालावलीकर, राजापूरकर, बारदेशकर, साष्टीकर, इ. ज्ञातिघटक हे त्या त्या गावावरून पडले असले तरी सर्व सारस्वत एकच आहेत. त्यात लहान मोठे असा भेदभाव नाही.
भालावलीकर सारस्वत हे पुस्तक नसून तो उत्कृष्ट ग्रंथ आहे. हा गेल्या १०० वर्षांचा नुसता इतिहास नाही तर त्या त्या वेळी त्या लोकांनी दूरदृष्टी ठेवून आणि नि:स्वार्थीपणे मदत देऊन उभे केलेल्या कार्याची नोंद आहे. त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता या ग्रंथाद्वारे व्यक्त केली आहे. हा ग्रंथ नुसता वाचनीय नाही तर संग्रही ठेवण्यासारखा आहे. आजच्या आणि येणाऱ्या पुढील पिढ्यांना तो प्रेरणादायी ठरणार आहे.
सत्काराला उत्तर देताना प्रमोद तेंडुलकर म्हणाले, आम्हा संपादकांचा केलेला सत्कार हा प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे असे आम्ही समजतो. कारण हे काम करताना अनेकांचा सहभाग लाभलेला आहे. त्या सर्वांचा हा सन्मान आहे.
पुस्तकाच्या संपादकीयात तसेच यापूर्वी निवेदिका स्मिता आपटे यांनी वाचलेल्या संपादक अशोक सिनकर यांच्या मनोगतात अनेक मुद्दे आलेले आहेत. मला फक्त आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल. शंभर वर्षाचे अहवाल वाचणे, त्यातील आवश्यक त्या नोंदी घेणे, मराठी इंग्रजी भाषांतर करणे, संबंधित फोटो जमविणे ही सर्वात मोठी, कठीण, वेळखाऊ आणि महत्त्वाची कामगिरी संपादक अशोक जनार्दन सिनकर यांनी पार पाडलेली आहे.
त्यानंतरच्या कामात लेखावर चर्चा करून काही नवीन भाग जोडणे, काही काढणे यात आमचा स़ंपादक म्हणून सहभाग राहिला आहे. तसेच राहुल साखळकर, अशोक सावळाराम सिनकर, विश्वस्त आर. आर. तेंडुलकर तसेच डिझाईनर व छपाई करणाऱांचाही सहभागही आहे. त्याची नोंदही ग्रंथात घेतली आहे.
हे असे मोठे काम करताना काही त्रुटी राहणे शक्य आहे त्याबद्दल आम्ही संपादकीयात अगोदरच क्षमा मागितली आहे. सर्वांना विनंती आहे की हा ग्रंथ वाचा त्यातील काही त्रुटी असतील, आपल्या काही सूचना असतील त्यासंबंधी समाज माध्यमांवर चर्चा करू नये. तर त्या मंडळाकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्याची नोंद घेण्यात येईल. ही पहिली आवृत्ती आहे, हे लक्षात घ्यावे.
मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ सिनकर यांनी आपल्या भाषणात पुस्तक प्रकाशनाविषयी भूमिका आणि मंडळाच्या कार्याची दिशा स्पष्ट केली. ते दा. कृ. स़ोमण यांच्या भाषणाच्या अनुषंगाने म्हणाले, तुम्ही भालावली, लोणारचा उल्लेख केला. आम्ही आमच्या सदस्यांना तेथे सहलीला घेऊन जाऊ आणि तुम्हालाही निमंत्रण देऊ.
राहुल साखळकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. पुस्तक प्रकाशन कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी कल्पेश साखळकर व त्यांचे सहकारी कलाकार यांनी सुमधुर गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
संस्थापक संपादक
रमेश औताडे 7021777291
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
Comments
Post a Comment