आम्रपाली ची काश्मीर ते कन्याकुमारी बाईक मोहीम
वनरक्षक आम्रपाली पडघण ची 'कन्याकुमारी ते काश्मीर' ऐतिहासिक बाईक मोहीम
संरक्षणासोबतच जनजागृतीचा नवा अध्याय !
मुंबई / रमेश औताडे
निसर्ग संवर्धन आणि वन्यजीव संरक्षणासाठी झोकून देणाऱ्या बोर व्याघ्र प्रकल्पातील वनरक्षक आम्रपाली देवीदास पडघण आता एका धाडसी मोहिमेसाठी सज्ज झाल्या आहेत. 'फॉरेस्ट टू फ्रंटियर' (Forest to Frontier) या संकल्पनेखाली त्या कन्याकुमारी ते काश्मीर (K2K) असा सुमारे ३,६०० किलोमीटरचा प्रवास सोलो बाईक राईडद्वारे पूर्ण करणार आहेत.
आम्रपाली या गेल्या ९ वर्षांपासून महाराष्ट्र वन विभागात कार्यरत असून, सध्या त्या बोर व्याघ्र प्रकल्पातील 'नवेगाव बीट' येथे कार्यरत आहेत. केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर एक पॅशन म्हणून त्या जंगलाची राखण करतात.
* वन्यजीव तज्ज्ञ: त्यांनी बोर अभयारण्यात ११४ हून अधिक फुलपाखरांच्या प्रजातींची नोंद केली आहे.
* सर्पमित्र: मानवी वस्तीत शिरलेल्या शेकडो सापांना (ज्यात नाग आणि अजगरांचा समावेश आहे) त्यांनी सुरक्षितरीत्या जीवनदान दिले आहे. त्यांच्या सापांवरील संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध्ये घेण्यात आली आहे.
* पुरस्कार: त्यांना प्रतिष्ठित 'वनदुर्गा पुरस्कार (२०२१)' आणि 'सातपुडा टायगर लँडस्केप संवर्धन हिरो अवॉर्ड २०२५' देऊन गौरविण्यात आले आहे.
ऐतिहासिक ३,६०० किमीची मोहीम
अमर एंड्युरो पार्क, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्रपाली ही मोहीम ७ दिवसांत पूर्ण करणार आहेत. या प्रवासात त्या १४ राज्यांतून जाणार असून दररोज सुमारे ५०० ते ६०० किमीचे अंतर पार करतील.
ही मोहीम केवळ साहसासाठी नसून, त्याद्वारे आम्रपाली देशभरात वन्यजीव संवर्धन, वनांचे महत्त्व आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहेत. प्रत्येक मोठ्या थांब्यावर त्या स्थानिक लोकांशी संवाद साधून निसर्ग रक्षणाची जाणीव करून देतील.
प्रवासाचा मार्ग (७ दिवसांचा आराखडा):
* दिवस १: कन्याकुमारी ते बेंगळुरू (६७० किमी)
* दिवस २: बेंगळुरू ते हैदराबाद (५७० किमी)
* दिवस ३: हैदराबाद ते नागपूर (५०० किमी)
* दिवस ४: नागपूर ते झाशी (६०० किमी)
* दिवस ५: झाशी ते दिल्ली (४०० किमी)
* दिवस ६: दिल्ली ते जम्मू (५९० किमी)
* दिवस ७: जम्मू ते श्रीनगर (२८० किमी)
> "ज्या जंगलांचे लोक सहसा दर्शन घेऊ शकत नाहीत, त्या जंगलांचे संरक्षण आम्रपाली यांनी वर्षानुवर्षे केले आहे. आता त्या संपूर्ण भारताला हे सांगण्यासाठी निघाल्या आहेत की, आपला निसर्ग वाचवणे किती गरजेचे आहे," अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला जात आहे.
>
या मोहिमेसाठी त्यांना अशोक मुन्ने (प्रसिद्ध गिर्यारोहक) आणि राहुल हिंगले यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. एका महिला वनरक्षकाचा हा प्रवास तमाम भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
7021777291
Comments
Post a Comment