धगधगती मुंबईच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
२०२६ चे पुरस्कार जाहीर
जेष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवन गौरव पुरस्कार तर सिनेअभिनेते विजय पाटकर, योगेश चिकटगावकर, के.के.शेलार,रमेश कदम यांचाही पुरस्कारांमध्ये समावेश
मुंबई / रमेश औताडे
धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार सोहळा तसेच नवप्रेरणा कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळा शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत स्वर्गीय अण्णासाहेब पाटील सभागृह, सेक्टर ४–५, कोपरखैरणे, नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
धगधगती मुंबई हे वृत्तपत्र गेली सोळा वर्षे अखंडपणे जनतेच्या न्यायहक्कासाठी लढणारे माध्यम म्हणून कार्यरत आहे. मुद्रित वृत्तपत्रासह यूट्यूब चॅनल व ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून सोशल मीडियावर वेगळे वलय निर्माण करत सर्वसामान्यांचा आवाज म्हणून धगधगती मुंबई ओळख निर्माण करत आहे.
या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले जात असून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवून देणे, उपचारादरम्यान रुग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच अनाथाश्रम व वृद्धाश्रमांमध्ये दरवर्षी दोन ते तीन वेळा अन्नदान व वस्त्रदानाचे कार्यक्रम राबविले जात आहेत. हे सर्व सामाजिक कार्य वाचक, जाहिरातदार व हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच शक्य होत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दरम्यान, धगधगती मुंबई २०२६ राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
सामाजिक सेवेबद्दल समाजरत्न पुरस्कार धारावीचे समाजसेवक रमेश कदम, समाजभूषण पुरस्कार उन्नतीचे चेअरमन हनुमंत रांजणे आणि कोपरखैरणे येथील समाजसेवक वसंत जाधव (सर) यांना जाहीर झाला आहे.
शैक्षणिक रत्न पुरस्कार प्रताप महाडिक, साहित्यरत्न पुरस्कार डॉ. शांताराम कारंडे, युवा राजकीय रत्न पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेवक गणेश सकपाळ (घणसोली), उद्योगरत्न पुरस्कार सौ. अनुजा कौतिक दांडगे (महाराष्ट्र बाजार पेठ) तसेच उद्योजक के. के. शेलार यांना देण्यात येणार आहे.
वैद्यकीय रत्न पुरस्कार नवी मुंबईतील प्रसिद्ध हाडवैद्य डॉ. सचिन वरखडे आणि एमबीबीएस डॉ. सुरज प्रकाश पाटील यांना जाहीर झाला आहे.
कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना कलारत्न पुरस्कार तर लोककलावंत योगेश चिकटगावकर यांना कला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
कायद्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी नवी मुंबईतील अॅड. मनीषा योगेश चव्हाण यांना कायद्यारत्न पुरस्कार, सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर यांना सहकारत्न पुरस्कार, तर दलित मित्र पुरस्कार मुंब्रा-ठाणे येथील ज्येष्ठ नगरसेवक राजन नारायण कीने यांना जाहीर करण्यात आला आहे.
तसेच उत्कृष्ट संस्था म्हणून सुका व ओला कचरा वेगळा करून कचरा व्यवस्थापनाबाबत समाजप्रबोधन करणाऱ्या संगम प्रतिष्ठान या संस्थेलाही सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय नवरात्री उत्सव काळात DDM न्यूजच्या माध्यमातून पॉडकास्ट घेतलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
सदर सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नवी मुंबई येथे आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
7021777291
Comments
Post a Comment