आझाद मैदानात ३२४ प्रकल्पग्रस्तांचे ३ महिन्यांपासून बेमुदत उपोषण
मुंबई / रमेश औताडे
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या नागोठणे प्रकल्पातील ३२४ प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा शासनस्तरावर निर्णय होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी मुंबईतील आझाद मैदानात गेल्या तीन महिन्यांपासून बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. या बैठकीस जिल्हाधिकारी रायगड, उद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर सात दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अद्याप प्रत्यक्षात कोणताही लेखी आदेश किंवा नियुक्ती प्रक्रिया सुरू झालेली नाही, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी रायगड यांनी ३२४ प्रकल्पग्रस्तांची यादी तयार करून अहवाल कंपनीकडे सादर केला होता. तरीही कंपनीकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप उपाध्यक्ष रोशन जामेकर यांनी केला. शासनाच्या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याने १ सप्टेंबर २०२४ पासून आझाद मैदानात सर्व प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
कामगार संघटनांच्या मते, निर्णय केवळ कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्तांवर अन्याय सुरूच आहे. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तरीही शासन व कंपनी प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून ३२४ प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment