शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे विकासाचे फुलपाखरू
जमिनीतच आमचा श्वास आहे; ती गेली तर आम्ही मारणार !
मुंबई / रमेश औताडे
तिसरी मुंबई उभारणीच्या नावाखाली दाखवले जाणारे विकासाचे फुलपाखरू आज सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी भीतीचे आणि असुरक्षिततेचे प्रतीक बनले आहे. हा विकास आमचा नाही, तर आम्हाला आमच्या जमिनीतून, पाण्यातून आणि मुळातून उपटून टाकणारा आहे, अशी वेदना उरण तालुक्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
पिढ्यान्पिढ्या जोपासलेली सुपीक शेती, भातखाचरं, फळबागा आणि गावाची ओळख असलेली जमीन आता कागदावरच्या रेषांमध्ये अडकली आहे. “आम्ही शेती करून जगतो, जमिनीत आमचा श्वास आहे. तीच जमीन गेली तर आम्ही कुठे जायचं?” असा सवाल एका ज्येष्ठ शेतकऱ्याने डोळ्यात पाणी आणून केला.
विकासाच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित केल्या जात आहेत, पण त्याबदल्यात मिळणारी भरपाई अपुरी असून पर्यायी रोजगाराचे आश्वासन केवळ कागदावरच असल्याचे शेतकरी सांगतात.
शेती गेली तर केवळ उत्पन्नच नाही, तर घर, कुटुंबाची सुरक्षितता आणि भविष्यही हिरावून घेतले जाते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबांना स्थलांतराची भीती सतावत आहे. “आज जमीन जाते, उद्या गावच नकाशावरून पुसलं जाईल,” अशी खंत एका महिलाशेतकऱ्याने व्यक्त केली.
तिसऱ्या मुंबईच्या स्वप्नात मोठ्या इमारती, रस्ते आणि उद्योग दिसत असतील; पण त्या स्वप्नांच्या पायाशी आमच्या आयुष्याची राख होणार आहे, अशी भावना गावोगाव ऐकायला मिळत आहे. शेती आणि निसर्गाशी जोडलेले जीवन अचानक तोडून टाकणे म्हणजे आम्हाला जगण्याच्या हक्कापासून दूर ढकलणे असल्याचे शेतकरी सांगतात.
विकास हवा, पण तो माणुसकीला धरून हवा. आमच्या संमतीशिवाय, आमचे पुनर्वसन ठोसपणे ठरविल्याशिवाय आणि आमच्या भविष्याची हमी दिल्याशिवाय असा विकास स्वीकारता येणार नाही, असा एकमुखी सूर शेतकऱ्यांतून उमटत आहे. तिसरी मुंबई उभी राहो, पण शेतकऱ्यांच्या आयुष्यावर बुलडोझर फिरवून नाही. अशी भावनिक आणि आर्त हाक उरण तालुक्यातील शेतकरी देत आहेत.
Comments
Post a Comment