खोट्या गुन्ह्यांच्या नोंदीविरोधात आंबेडकर सेनेचे आमरण उपोषण
आझाद मैदान,
मुंबई प्रतिनिधी रमेश औताडे
पनवेल शहरातील सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे व मनोहर कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, पनवेल पोलिस जातीय वाद उकरून काढत दारू गुटखा माफियाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवत आहेत.
सह-पोलिस निरीक्षक राजेंद्र घेवडकर यांनी कोणताही समज न देता आपल्यावर बनावट स्वरूपाचे गुन्हे दाखल करून ‘चॅप्टर केस’ लावल्याचा दावा कांबळे बंधूंनी केला आहे. यामागे दारू-गुटखा माफियांचे हितसंबंध असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
आपण बौद्ध समाजाचे समाजसेवक असून अन्यायाविरोधात सातत्याने आवाज उठवत असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांवर खोटे व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल करून त्यांचे चारित्र्यहनन केले जात असल्याचा आरोप करत आंबेडकर सेनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, चॅप्टर केस, प्रतिबंधात्मक कारवाई आणि किरकोळ कारणांवर गुन्हे नोंदवून सामाजिक कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. या कारवाईमुळे संबंधितांचे सामाजिक जीवन उद्ध्वस्त होत असून रोजगार आणि प्रतिष्ठेवर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही प्रकरणांमध्ये गुन्ह्यांचे स्वरूप किरकोळ असतानाही गंभीर कलमे लावून दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आंबेडकर सेनेचे पदाधिकारी मनोहर वसंत कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणांबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळावा, खोट्या गुन्ह्यांच्या नोंदी रद्द कराव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येत आहे.
दरम्यान, आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Comments
Post a Comment