शिवजयंती निमित्त विशेष लेख !
शिवजयंती निमित्त विशेष लेख !
दंतकथांमुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही !
आजही इथे जन्मलेल्या बाळाला शिवाजी महाराज कोण हे सांगायची वेळच येत नाही. पण दंतकथांमुळे आजही महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. किंबहुना निरक्षर मराठ्यांनी स्वत:च्या रक्ताने इतका तेजस्वी इतिहास घडविला पण आजचे साक्षर मराठे त्या इतिहासाला विसरले कि काय अशी शंका येऊ लागली आहे ती सुद्धा या दंतकथांमुळेच.
खरा इतिहास माहित असलेला माणूस कधीही आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्येमुळे निश्चितच खचणार नाही यात शंकाच नाही. याचे कारण म्हणजे आज जे व्यक्तिमत्व विकासाचे वर्ग घेतले जातात त्याचा अभ्यासक्रम जर पाहिला तर तो अभ्यासक्रम चारशे वर्षापूर्वी जगात एकमेव राजा जगला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
त्यातला पहिला मुद्दा स्वप्न बघा आणि कितीही संकटे आली तरी स्वप्नांचा पाठलाग करणे सोडू नका. स्वराज्य स्थापन करताना आणि केल्यानंतर ही महाराजांना अडचणी व संकटांना तोंड द्यावेच लागले. पण ५० वर्षांच्या आयुष्यात महाराज फक्त एकच स्वप्न घेऊन जगले ते स्वप्न म्हणजे स्वराज्य. दुसरा मुद्दा दृढ निश्चय. याची बरीच उदाहरणे स्वराज्याच्या इतिहासात पहायला मिळतात.
एक उदाहरण सांगायचे झाल्यास पावन खिंडीतील बाजींचा पराक्रम. जो पर्यंत तोफांचे आवाज कानावर येत नाहीत तोपर्यंत यमालाही माझा प्राण घेऊन जाण्यास परवानगी नाही. केवढा तो दृढ निश्चय. आज शाळा कॉलेजमधील विद्यार्थी परिक्षेतील अपयशाने आत्महत्या करतात, पण या शिवचरित्रातून हेच शिकायला हवे की आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे, त्याचा योग्य तो वापर करुन आपण परिक्षेत यश कसे खेचून आणू शकतो.
हिरकणी ची गोष्ट म्हणजे निव्वळ दंतकथाच आहे. याची बरीच कारणे अभ्यास केल्यास आढळतात. हिरकणीचे गाव हे रायगडाच्या पायथ्याशी असे सांगितले जाते. जर रायगडाकडे जाणारा मार्ग तिच्या गावातून जात असेल तर फक्त मडकाभर ताक विकायला ती गडावर का जाईल ? दुसरा मुद्दा, त्याकाळी घरोघरी गाई म्हशी होत्या. त्या जितक्या जास्त तितके ते घर सुखसमृद्ध मानले जायचे. असे असेल तर ताक विकत कोण घेईल ?
तिसरा मुद्दा, ज्यावेळी रायगड राजधानी करण्याचे ठरले. त्याआधी महाराजांनी रायगडची सतरा किलोमीटरची प्रदक्षिणा केली आणि मगच त्यांनी बांधकाम प्रमुख हिरोजी इटळकरांना सांगितले की गडाचे सर्व कडे ताशीव आहेत, शत्रु वर चढून येणे कठीण. तख्खास जागा हीच राखावी कारण राजांना माहित होते कि कोंढाण्याचा द्रोणागिरी कडा सुभेदार तानाजींनी सर करुन कोंढाणा स्वराज्यात आणला होता, तर शत्रू ही हे करु शकतो. त्यामुळे गडाला सुरक्षित तटबंदी पण बांधली गेली. आणि म्हणूनच हिरकणी ही निव्वळ दंतकथाच आहे.
सरकारकडून या दंतकथेच्या आधारावर महिलांना हिरकणी पुरस्कार दिला जातो त्याचे नाव बदलून राणी लक्ष्मीबाई पुरस्कार असे नामकरण करणे योग्य ठरेल.
तानाजींनी कोंढाणा स्वराज्यात आणला त्या इतिहासाबद्दल पण घोरपडीचा उल्लेख केला जातो. पण रात्री अंधारात ३०० मावळ्यांना घेऊन द्रोणागिरीचा कडा सर करायचाय तर सुभेदार घोरपडीवर अवलंबून राहतील का ? समजा घोरपडीला दोर बांधून सोडली तर आजही कोणी सांगू शकत नाही कि ती घोरपड सरळच जाईल . जरी सरळ गेलीच तरी त्या कड्यावर असलेल्या निवडुंगाच्या झाडात दोर अडकला तर घोरपड येऊन तो दोर सोडवून वर जाईल का ? त्या तीनशे मावळ्यांमध्ये यशवंत घोरपडे नावाचा मावळा होता. तो कडा सर करण्यात तरबेज होता म्हणून तानाजींनी त्याला पहिला दोर लावण्यास सांगितले व त्या दोराच्या आधारे आणखी काही दोर वर नेऊन सोडले आणि तीनशे मावळे गडावर पोहोचले व उदयभानशी दोन हात करुन कोंढाणा स्वराज्यात आणला. पण दुर्दैवाने यशवंत घोरपडेची यशवंती घोरपड झाली. आणि घोरपडेंच नाव इतिहासातून कायमचे पुसले गेले, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.
जगात विधीवत झालेले पहिले राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! कारण विधीपूर्वक राजाभिषेक फक्त दोनच झाले, एक छत्रपती शिवाजी महाराज व दुसरे छत्रपती शंभूराजे. आज सुशिक्षित मराठे राज्याभिषेक असा उल्लेख करतात पण हा अभिषेक राज्यावर न होता राजांवर झालेला आहे म्हणून त्याचा उल्लेख राजाभिषेक असा करणेच योग्य ठरेल याचे महत्वाचे कारण म्हणजे राजाभिषेकासाठी गागाभट्टांनी जो ग्रंथ रायगडावर लिहिला त्याचे नाव ही राजाभिषेक प्रयोग असेच आहे.
इतका तेजस्वी इतिहास महाराष्ट्राला लाभला आहे . पण जो माणूस आपला इतिहास विसरतो तो स्वत:च्या आयुष्यातही इतिहास घडवू शकत नाही हा ही एक इतिहास आहे. फक्त लोकांच्या मनातून दंतकथाच जर पुसल्या गेल्या व खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला तर प्रत्येक जण यशस्वी होईल यात शंकाच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा ! जय महाराष्ट्र !!
लेखकांचा परिचय
शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त श्री राजू देसाई यांनी पाचशे पाचवेळा रायगड दर्शन स्वतः करुन शालेय विद्यार्थ्यांपासून तर सर्वसामान्य नागरिकांना, शिवभक्तांना घडविले आहे. एका रात्रीत त्यांनी टकमक टोक गाठले असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांच्या कर्तबगारीला शाबासकी दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या संबंधित समितीवर सुद्धा त्यांनी काम केले आहे. मी लग्न करीन तर अशाच मुलीशी जी माझ्या समवेत रायगडावर लग्न करायला तयार होईल,अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती आणि त्याप्रमाणे श्रद्धा सावंत या उच्च विद्या विभूषित मराठमोळ्या युवतीने रायगडावर शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या समवेत मोजक्याच मित्रमंडळींच्या साक्षीने विवाह केला. त्यावेळी श्री राजू देसाई हे ४७ वर्षांचे होते. शिवनेरी, रायगडसह अनेक किल्ले दर्शन त्यांनी शिवभक्तांना घडविले असून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे महाराज यांचा खरा इतिहास घरा घरात, मनामनात पोहोचविण्याचे महत्कार्य केले आहे.*
प्रसिद्धी : पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment