देशव्यापी संपाबतात म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली माहिती

मुंबई / रमेश औताडे 

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ गुरुवार, दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला मुंबईसह राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय, निमशासकीय, महापालिका तसेच इतर आस्थापनांतील कामगार, कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने संपात सहभागी झाले.

म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई (संलग्न : हिंद मजदूर सभा) यांच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन श्रम संहितांमुळे कामगारांच्या हक्कांवर गदा येत आहे. कंत्राटीकरणाला प्रोत्साहन, खासगीकरणाची गती, सार्वजनिक क्षेत्रातील कपात, तसेच सामाजिक सुरक्षेतील अनिश्चितता यामुळे कामगार वर्गात तीव्र असंतोष निर्माण झाला असल्याचे युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले.

यावेळी विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस श्री. निवृत्ती झुंजार, उपाध्यक्ष श्री. अशोक गायकवाड, कोषाध्यक्ष श्री. अशोक चव्हाण, केंद्र सचिव श्री. संजय गोरे आदींचा समावेश होता. त्यांनी केंद्र सरकारने कामगारांशी सवांद न साधता घेतलेल्या निर्णयांचा निषेध व्यक्त केला.

नेत्यांनी सांगितले की, महागाई, बेरोजगारी, वेतनातील असमतोल, पेन्शन योजनांतील बदल आणि सामाजिक सुरक्षेचा अभाव या प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. कामगारांना किमान वेतनाची हमी, स्थायी नोकरी, सुरक्षित कामाचे वातावरण आणि आरोग्य सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या हितासाठी केलेल्या कायद्यांची आठवण करून देत, त्या हक्कांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

संपादरम्यान विविध ठिकाणी निदर्शने, घोषणाबाजी आणि सभांचे आयोजन करण्यात आले. संप शांततेत पार पडल्याची माहिती संघटनांनी दिली. केंद्र सरकारने तातडीने कामगार प्रतिनिधींशी चर्चा करून प्रश्न सोडवावेत, अन्यथा भविष्यात आणखी व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनतर्फे देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा