मुंबईचा मराठी महापौर विराजमान झाला

             विकासाचा नवा संकल्प जाहीर केला
     
   सोबत मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाचे अध्यक्ष                                 मारुती मोरे

मुंबई  / रमेश औताडे 

मुंबई महानगरपालिकेच्या मराठी महापौरांनी बुधवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारताच पालिका मुख्यालयात उपस्थिती लावली. पदग्रहणानंतर त्यांनी सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका पत्रकार कक्षाला भेट देत पत्रकारांच्या हस्ते सत्कार स्वीकारला. यावेळी पत्रकार कक्षाचे अध्यक्ष मारुती मोरे, उपाध्यक्ष सचिन धानजी, इंद्रायणी नार्वेकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना महापौरांनी आपल्या पुढील वाटचालीचा आराखडा मांडला. “केंद्रात, राज्यात आणि मुंबई महानगरपालिकेत आमचेच सरकार असल्याने विकासकामांना वेग मिळेल. गोरगरीब जनतेला न्याय आणि मदत देणे हे आमचे प्राधान्य राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

उपनगरांमध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईतील रुग्णालयांच्या दर्जात सुधारणा करून राजावाडी रुग्णालय ‘एम्स’च्या धर्तीवर विकसित करण्याचा संकल्प त्यांनी मांडला. पालिकेच्या शाळांमध्येही गुणवत्तावाढीसाठी ठोस पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.

मुंबईतील बेकायदेशीर बांगलादेशी फुटपाथ फेरीवाल्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. “२२ वर्षे जनतेत रस्त्यावर जाऊन काम केले आहे; तेच काम आता महापौर म्हणून करणार,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई व राज्याने प्रगती केली असून, पूर्वीच्या सत्ताकाळात अनेक प्रकल्प स्थगित होते, असा आरोपही त्यांनी केला. “बोलल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला मराठी महापौर दिला,” असेही त्या म्हणाल्या.

मुंबई पावसाळ्यात तुंबणार नाही, यासाठी नालेसफाई व पायाभूत सुविधांवर भर दिला जाईल. मराठी माणूस, मराठी शाळा आणि कर भरणाऱ्या मुंबईकरांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्कार स्वीकारताना त्यांनी आवाहन केले की, “शाल-फुलांचा सत्कार करू नका; त्या ऐवजी महापौर निधीत आर्थिक मदत करा. हा निधी गरजू नागरिकांसाठी वापरण्यात येईल.”
नव्या महापौरांच्या घोषणांमुळे पालिकेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा