मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे 


सोलापूर जिल्ह्यातील अनुप बायस व त्यांचे कुटुंब हे शेतकरी असून त्यांच्या मालकीची शेती आरोपी पवार कुटुंबियांनी बळकावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास संपूर्ण बायस कुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आत्मदहन करणार असल्याचा इशारा अनुप बायस यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

अनुप बायस यांनी सांगितले की, पोलिस प्रशासन, स्थानिक राजकीय पक्ष आणि गावगुंड यांची मिलीभगत असल्याने भूमाफिया मोकाट सुटले असून ४ ते ५ कोटी रुपयांची मौल्यवान जमीन बळकावण्यात आली आहे. ही जमीन कायदेशीररीत्या आमच्या नावावर असून त्याच आधारे बँकेकडून शेती तसेच कुटुंबातील लग्नासाठी कर्जही घेण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात जमिनीचा ताबा आमच्याकडे नसल्याने आम्ही आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलो आहोत.

या प्रकरणात सुभाष देशमुख व अन्य दोन भाजप आमदारांचा उल्लेख करत, सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी असूनही आम्हाला न्याय मिळत नसल्याची खंत अनुप बायस यांनी व्यक्त केली. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेत बायस कुटुंबीयांनी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून जमिनीचा ताबा परत द्यावा व भूमाफियांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा