राष्ट्रीय आपत्तीच्या काळात इराणमध्ये बहाई समुदायावर दोषारोप


मुंबई / रमेश औताडे 

इराणमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय संकटाच्या पार्श्वभूमीवर बहाई समुदायाला पुन्हा एकदा दोषारोपांचे लक्ष्य बनवले जात असून त्यांच्या विरोधात द्वेष भडकवला जात असल्याची तीव्र चिंता बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाने व्यक्त केली आहे. 

राज्य-प्रायोजित माध्यमे आणि वाढत्या छळाच्या माध्यमातून ही मोहीम चालवली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
१९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतरपासून प्रत्येक सामाजिक, आर्थिक किंवा राजकीय संकटाच्या वेळी बहाई समुदायावर खोटे आरोप, दुष्प्रचार आणि द्वेष मोहिमा राबवण्याची परंपरा इराणच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने सुरू ठेवली असल्याचे बहाई आंतरराष्ट्रीय समुदायाचे म्हणणे आहे.

१ फेब्रुवारी रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग  या सरकारी माध्यमसंस्थेने आंदोलनांशी संबंधित दोन बहाई व्यक्तींचे तथाकथित कबुलीजबाब प्रसारित केले. मानवाधिकार संघटनांच्या मते, इराणमध्ये दबाव, धमकी आणि छळाद्वारे कबुलीजबाब घेण्याची प्रथा दीर्घकाळापासून सुरू आहे.

जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रांमध्ये बहाई समुदायाच्या प्रतिनिधी सुश्री फहांदेज यांनी सांगितले की, “इराण सरकारकडून सत्य विकृत करून खोटे आरोप पसरवण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे. राष्ट्रीय संकटाच्या प्रत्येक क्षणी बहाई समुदायाला बळीचा बकरा बनवले जाते.” तसेच “बहाई लोकांनी दशकानुदशके चाललेल्या छळानंतरही हिंसेचा मार्ग स्वीकारलेला नाही. आपल्या देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याची त्यांची इच्छा हीच त्यांच्या मागणीमागची भूमिका आहे.”

सुश्री फहांदेज यांनी स्पष्ट केले की, “धर्म, जात किंवा पार्श्वभूमी काहीही असो, प्रत्येक इराणी नागरिकाला आपल्या देशाच्या उभारणीत सहभागी होण्याचा मूलभूत अधिकार आहे.”

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा