क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार; रणजित सावरकर यांचा निर्धार
क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार; रणजित सावरकर यांचा निर्धार
मुंबई / रमेश औताडे
भारतातील आणि महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार, असा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश पत्रकार परिषदमध्ये केला.
१४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, १२ ऑक्टोबर २०२५ ला जी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीनुसार आणि त्या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांनुसारच निवडणुका घेण्यात याव्यात. तरीही न्यायालयाचा हा आदेश धाब्यावर बसवून धर्मादाय उपायुक्तांनी १ नोव्हेंबरला काढलेल्या आदेशात २०२२ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीनुसारच निवडणूक घेण्याचे परिपत्रक काढले. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर ७ तारखेला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने यावर संताप व्यक्त केला आणि धर्मादाय उपायुक्तांना त्यांचा आदेश मागे घेण्यास सांगितले.
त्यानुसार उपायुक्तांनी हा आदेश मागे घेण्याचे न्यायालयात मान्य देखील केले. परंतु अचानक ८ नोव्हेंबरला आम्हाला असा कुठलाही आदेश मिळालाच नसल्याचे सांगत उपायुक्तांनी निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार ९ नोव्हेंबरला मतदान झाले. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश देऊनही केवळ राजकीय दबावापोटी न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून धर्मादाय आयुक्तांनी बेकायदा निवडणूक घेतली. त्यामुळे या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकला. अशा पद्धतीने लोकशाहीला काळीमा फासण्याची घटना या निमित्ताने झाली आहे, असे रणजित सावरकर यांनी सांगितले.
ही निवडणूक नवीन क्रीडा धोरणानुसार होणे अपेक्षित होते, यानुसार झालेल्या घटनादुरुस्ती नुसारच निवडणूक होणे अपेक्षित होते; परंतु मूळ मतदारयादीत फेरफार करण्यात आला. ज्या मुंबई जिल्ह्यात बॉक्सिंगचा जन्म झाला, तेथील सावरकर स्मारकासारख्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बॉक्सिंग प्रशिक्षण होते, अशा मुंबई जिल्ह्याला जन्मशताब्दी वर्षात मतदारयादीतून काढून टाकण्याचे पाप या निवडणुकीत करण्यात आले आहे.
ठाणे, पालघर या ठिकाणीही बॉक्सिंगसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात. अशा ७ जुन्या आणि महत्त्वाच्या बॉक्सिंग क्लबला या मतदान प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. ज्या १३ जिल्ह्यांमध्ये एकदाही बॉक्सिंग स्पर्धा झाली नाही, अशा जिल्ह्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला.
धक्कादायक म्हणजे प्रवीण दरेकर ज्या मुंबई उपनगर संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत, त्या संघटनेचे थकबाकीमुळे आपोआप सदस्यत्व रद्द झाले आहे. ज्या संघटनांची थकबाकी असते, त्यांना सहकार कायद्यानुसार मतदान करता येत नाही. तरीही दरेकर मुंबई उपनगर संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला उभे राहून अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ही गोष्टच मुळात बेकायदेशीर आहे. यामुळे ही निवडणूकच पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा आमचा दावा आहे, असेही रणजित सावरकर यांनी सांगितले.
या निवडणुकीविरोधात उच्च न्यायालयात तातडीने दाद मागितली जाणार असून, अशा सर्व क्रीडा संघटना राजकीय अड्डे बनवण्याचा हा सुरु असलेला प्रयत्न हाणून पाडेपर्यंत लढत राहणार, असा निर्धार रणजित सावरकर यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment