१९ वर्षाच्या अन्यायाविरोधात रहिवाशांचा म्हाडा कार्यालयावर मोर्चा
मुंबई / रमेश औताडे
म्हाडा न्यू पीएमजीपी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मुलुंड (पूर्व) येथील १,३९९ सभासदांचा पुनर्विकास प्रकल्प सन २००७ पासून सुरू असून, तब्बल १९ वर्षे उलटूनही हा प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. आजही ६०६सदनिका व ४७ दुकाने म्हाडा प्रशासनाकडून बांधून पूर्ण करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पातील रहिवासी व सभासद गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या हालअपेष्टा सहन करीत आहेत.
गेल्या वर्षभरापासून बाधित रहिवासी सभासदांनी म्हाडा मुख्यालय, बांद्रा येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व उपाध्यक्ष (VP) यांची वारंवार भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना वेळ देण्यात येत नव्हती. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत जनकल्याण रहिवासी विकास समितीच्या वतीने दिनांक ९ जून २०२६ रोजी म्हाडा मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये सुमारे २५० हून अधिक बाधित रहिवासी सभासद सहभागी झाले होते. तसेच छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक मा. नामदेवराव जाधव साहेब व समितीचे कायदेशीर सल्लागार यांनी या आंदोलनास मोलाचे सहकार्य केले.
मोठ्या संख्येने नागरिक म्हाडा कार्यालयात दाखल झाल्याचे समजताच, नागरिकांच्या भेटीचा दिवस असतानाही संबंधित वरिष्ठ अधिकारी कार्यालयातून निघून गेले. तसेच प्रवेशद्वारावर उपस्थित असलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश करण्यासही मज्जाव करण्यात आला.
यानंतर मा. नामदेवराव जाधव साहेब यांच्या उपस्थितीत काही प्रतिनिधी सभासदांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून बाधित रहिवासी सभासदांची बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे जनकल्याण रहिवासी विकास समितीला आश्वासन देण्यात आले.
Comments
Post a Comment