प्रार्थनास्थळांवरील हल्ल्यांविरोधात ५ जूनला आझाद मैदानात विराट आंदोलन



मुंबई  / रमेश औताडे 

राज्यातील विविध भागांमध्ये ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांवर वाढत्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी ‘रॅपिड अॅक्शन टीम’च्या वतीने येत्या ५ जून रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विराट आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांसह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख महेंद्र उर्फ बबन कोळवे यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कोळवे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “राज्यात काही विशिष्ट प्रवृत्तींकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य केले जात आहे. मात्र अशा घटनांमध्ये सहभागी असलेल्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

गेल्या तीन महिन्यांत मुंबईसह राज्यातील अनेक भागांत प्रार्थनास्थळांवर धाड टाकणे, तोडफोड करणे, श्रद्धाळूंना धमकावणे अशा घटना घडल्याचा दावा यावेळी करण्यात आला. काही संघटनांकडून प्रार्थनास्थळांमध्ये धर्मांतर सुरू असल्याचे आरोप केले जात असले तरी ते पूर्णपणे निराधार असल्याचे कोळवे यांनी स्पष्ट केले. “प्रभू येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे. प्रार्थना करणे म्हणजे धर्मांतर नव्हे,” असे ते म्हणाले.

राज्य सरकारने या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच, जर अशा प्रकारच्या घटना थांबल्या नाहीत तर न्यायालयीन लढाही उभारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

५ जून रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक मुंबईत दाखल होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. आंदोलन शांततामय आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून, समाजात धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

तर बेस्टचा वीजपुरवठा व बस सेवा १८ जून पासून बंद होणार

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश