खाजगी ठेकेदारांसाठी कामगार मंत्री आहेत का ?


मुंबई / रमेश औताडे 

रायगड जिल्ह्यातील स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि विशेषतः कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर गंभीर नसल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. उद्योगांच्या नावाखाली रायगडमधील जमीन, संसाधने आणि पर्यावरण वापरले जात असताना स्थानिक युवकांना मात्र रोजगारापासून दूर ठेवले जात असल्याने संतापाची लाट निर्माण झाली आहे.

रायगडमध्ये मोठमोठे उद्योग उभे राहिले, कंपन्यांना कोट्यवधींच्या सवलती देण्यात आल्या, मात्र रोजगाराच्या बाबतीत स्थानिक तरुणांना फक्त आश्वासनांचे गाजर दाखवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांच्या नोकऱ्यांमध्येही मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील तब्बल २५० हून अधिक बाहेरील लोक कार्यरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे “रायगडच्या मुलांना रोजगार नाकारून बाहेरच्यांना संधी का?” असा सवाल आता उपस्थित होत आहे.

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर तब्बल २ हजार ५३२ स्थानिक तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना सरकार आणि कामगार खात्याची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक तरुणांना रोजगार देण्याऐवजी परजिल्ह्यातील लोकांना प्राधान्य देऊन रायगडच्या युवकांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे.

या गंभीर प्रकरणावर कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी केवळ बैठका आणि आदेशांची औपचारिकता पूर्ण केली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई दिसून येत नसल्याने युवकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “एक महिन्याची डेडलाईन” देण्याचे नाटक करून सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका स्थानिक लोकप्रतिनिधी आणि युवक संघटनांकडून होत आहे.

रोजगाराच्या नावावर फसवणूक, प्रशासनाची उदासीनता आणि मंत्र्यांची निष्क्रियता यामुळे रायगडमध्ये असंतोष उफाळून आला असून, स्थानिक तरुण आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. “स्थानिकांना न्याय द्या, नाहीतर खुर्ची सोडा,” असा इशारा युवकांनी सरकारला दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री