सुवर्णकार समाजाच्या प्रश्नांवर शासनाने ठोस भूमिका घ्यावी – संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाची मागणी
मुंबई / रमेश औताडे
पिढीजात सुवर्णकार समाजाच्या उद्योग, रोजगार आणि सामाजिक सुरक्षेशी संबंधित विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाजाच्या वतीने करण्यात आली. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत समाजाच्या समस्या आणि भविष्यातील रचनात्मक वाटचालीबाबत भूमिका मांडण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर यांनी सांगितले की, १९५५ ते २०२६ या कालावधीत सुवर्णकार समाजाने अनेक आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना केला आहे. बदलत्या परिस्थितीत पारंपरिक व्यवसाय टिकवण्यासाठी शासनाकडून विशेष सहाय्याची गरज आहे.
पत्रकार परिषदेत उद्योगवाढीसाठी सुलभ कर्जपुरवठा, PM विश्वकर्मा योजना आणि संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुवर्णकार कारागिरांना अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच असंघटित क्षेत्रातील सुवर्णकार कारागिरांना EPF, ESIC आणि पेन्शन योजनांचा लाभ मिळावा, यासाठी सामाजिक सुरक्षा कवच देण्याची मागणी करण्यात आली.
असंघटित सुवर्णकार कारागीर व वेल्डर्ससाठी विशेष विमा योजना लागू करावी, तसेच आर्थिक अडचणींमुळे पारंपरिक व्यवसाय सोडणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी करण्यात आली.
राज्यात संयुक्त सोनार गोल्ड अँड सिल्व्हर क्लस्टर उभारून कारागिरांना आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, डिझाईन सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी संघटनेने केली. HUID प्रणालीमुळे ग्राहकांचा विश्वास वाढत असून सोने-चांदी व्यवहारात पारदर्शकता येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१७ संदर्भात शासनाने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करून प्रामाणिक सुवर्णकार व्यावसायिकांना कायदेशीर संरक्षण द्यावे, अशी मागणी संघटनेने केली.
“भूतकाळातील वादांपेक्षा भविष्यातील रचनात्मक वाटचालीवर आमचा भर असून शासनाने सकारात्मक सहकार्य केल्यास सुवर्णकार समाज आत्मनिर्भर होईल आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियानात मोठे योगदान देईल,” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
Comments
Post a Comment