घणसोलीत मोबाईल टॉवरवरून वाद; रहिवाशांचा आक्रमक पवित्रा

नवी मुंबई / रमेश औताडे 

घनसोली सेक्टर १० परिसरातील मेघ मल्हार सिडको सोसायटीजवळ उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवरवरून रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित टॉवर मनमानी पद्धतीने व चुकीच्या ठिकाणी बसवण्यात आल्याचा आरोप करत रहिवाशांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, एअरटेल कंपनीकडून हा टॉवर उभारण्यात आला असून यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले गेले आहे. “नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी एअरटेल कंपनीचे काम करत आहेत का?” असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तसेच, हा टॉवर रहिवासी भागाच्या अत्यंत जवळ उभारण्यात आल्याने भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. चुकीचे सर्वेक्षण करून हा टॉवर बसवण्यात आल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या प्रकरणात तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “लवकरात लवकर हा टॉवर हटवण्यात आला नाही, तर कायदेशीर मार्गाने पुढील पावले उचलू,” असा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

दरम्यान, या गंभीर प्रकरणाकडे नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा