माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई ( प्रतिनिधी )

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, आज अंबानी, अडाणी, सुभाषचंद्र यांच्याकडे किती चॅनेल्स आहेत याचा अभ्यास केला, तर त्यांचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येईल. मीडियावरील हा कॉर्पोरेट कंट्रोल कमी झाला पाहिजे, त्यावर काही मर्यादा आल्या पाहिजेत. तसेच मीडियाच्या विविध भागांत केवळ एका कॉर्पोरेट हाऊसने प्रवेश करावा का, यावरही मर्यादा असाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

हा प्रयत्न एस. जयपाल रेड्डी माहिती व नभोवाणी मंत्री असताना करण्यात आल्याचा हवाला देत ते पुढे म्हणाले की, अनेक देशांत अशा प्रकारची बंधने आहेत. भारतात गेल्या दहा-बारा वर्षांत अशा प्रकारच्या बंधनांची अधिक गरज निर्माण झाली आहे.

माईणकरांच्या लेखांची प्रशंसा करत चव्हाण म्हणाले की, माईणकरांनी अशा अनेक विषयांना हात घातला आहे, ज्यावर मराठीत फारसे लिहिले जात नाही. पक्षांतराविषयीचा माईणकरांचा लेख किंवा वाजपेयी, जॉर्ज आणि प्रेमप्रकरण यांसारखे विषयही त्यांनी हाताळले आहेत.

माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी माईणकरांच्या अभ्यासपूर्ण प्रश्न विचारण्याच्या पद्धतीची प्रशंसा करत, आपल्या मुद्द्यांवर ते कसे ठाम असतात हेही सांगितले.

‘कटाक्ष’ हा स्तंभ ज्या दैनिकात छापला गेला त्या ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे यांनी गेली सात वर्षे दर आठवड्याला नवनव्या राजकीय विषयांना हात घालत आपल्या लेखणीचे फटकारे ओढणाऱ्या माईणकरांविषयी सांगितले. त्यांच्या एका भाषणाने प्रभावित होऊन आपण स्वतः त्यांना भेटल्याचा किस्साही त्यांनी सांगितला.

माजी खासदार कुमार केतकर यांनी आपल्या भाषणात माईणकरांच्या निर्भीड लेखणीची प्रशंसा करत सध्या इतक्या परखड लिखाणाची फार गरज असल्याचे नमूद केले.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी, न्या. साधना जाधव आणि प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांनीही आपल्या भाषणात माईणकरांचे अभ्यासपूर्ण लेख काळानुरूप योग्य असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी आपल्या लेखांत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विचार करणे आवश्यक असल्याचेही नमूद केले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र हुंजे यांनी केले.
जयंत माईणकर लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित ‘कटाक्ष’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना जाधव, सदामंगल प्रकाशनच्या प्रकाशक-संपादक प्रज्ञा जांभेकर आणि जयंत माईणकर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा