पात्र आणि संरक्षित फेरीवाले विक्रेत्यांचे आझाद मैदानात आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
मुंबईतील आझाद मैदान येथे पात्र आणि संरक्षित रस्त्यावरील फेरीवाले आणि विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन केले. आझाद होकर्स युनियन यांच्या नेतृत्वाखाली हजारो फेरीवाल्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनात केंद्र सरकारच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, रस्त्यावरील विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसून अनेक ठिकाणी फेरीवाल्यांवर अन्याय होत आहे. असे युनियन चे संस्थापक अध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी सांगितले.
युनियन चे सचिव जय शंकर सिंह म्हणाले, महापालिकेकडून कारवाई करताना विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जात आहे. काही ठिकाणी माल जप्त केला जात असून, परत मिळवण्यासाठी निश्चित नियम नसल्याची तक्रारही करण्यात आली.
स्थानिक स्तरावर काही गुंडांकडून नव्या फेरीवाल्यांकडून दररोज पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी प्रतिनिधींनी राज्य सरकारकडे निवेदन देत, रस्त्यावरील विक्रेत्यांना कायदेशीर संरक्षण देणे, दंडात्मक कारवाया थांबवणे आणि फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस निर्णय घेण्याची मागणी केली.
आंदोलनात मोठ्या संख्येने फेरीवाले, महिला विक्रेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलकांनी सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.
यावेळी संजय यादवराव , सलमा शेख पारसमल सेन, गुरमित कौर,कांता शिंदे, आदी पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment