आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्यांसाठी राजाराम जोशींचा आधार


मुंबई / रमेश औताडे

वाशी खाडी परिसरात आत्महत्येच्या विचारांनी ग्रासलेल्या अनेक व्यक्तींना नवसंजीवनी देण्याचे कार्य एका सामान्य नागरिकाने आपल्या धैर्याने आणि माणुसकीने केले आहे. नवी मुंबई वाशी गावातील रहिवासी राजाराम जोशी हे गेल्या काही वर्षांपासून जीव धोक्यात घालून संकटात सापडलेल्या व्यक्तींना वाचवत आहेत.

वाशी खाडी ही अनेकांसाठी आत्महत्येचे ठिकाण ठरत असताना, तिथे उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या व्यक्तींशी संवाद साधून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना त्या टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचे काम जोशी करत आहेत. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता, मानसिक अस्वस्थता यामुळे अनेक जण हतबल होतात. अशा वेळी जोशी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरतात.

आजवर त्यांनी ५० हून अधिक व्यक्तींचे प्राण वाचवले असून, अनेक वेळा पोलिस व अग्निशमन दलाच्या मदतीनेही ही कामगिरी पार पाडली आहे. मात्र, ही जबाबदारी त्यांनी कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेशिवाय स्वीकारली आहे. “समोरचा माणूस वाचला, हेच माझे बक्षीस आहे,” असे ते सांगतात.

कठीण प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणाऱ्या राजाराम जोशी यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असले, तरी आजवर त्यांना कोणत्याही शासकीय किंवा सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही, ही बाब खेदजनक आहे.

आत्महत्या हा उपाय नाही, तर प्रत्येक समस्येवर मार्ग असतो, हा विश्वास निर्माण करण्याचे काम जोशी सातत्याने करत आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने अशा कार्यकर्त्यांना पाठबळ दिल्यास अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने गंभीर व्हावे -- आमदार सचिन अहिर

मेघमल्हार संकुल अन् पुढील दिशा